सावंत कुटुंबातील वादावर पडदा; तानाजी आणि शिवाजीराव सावंतांचे अखेर मनोमीलन !
डॉ. तानाजी सावंत, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत आणि वाकवचे माजी सरपंच ऋतुराज सावंत यांचे एकत्रित छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
Tanaji Sawant and Shivaji Sawant : आमचे राजकारण तानाजी सावंतावर (Tajani Sawant ) अवलंबून नाही. आमच्यावर त्याचं राजकारण अवलंबून होते. पण त्याला वाटत होते की, मी आहे म्हणून आमचे राजकारण चालंतय. तानाजी सावंतांनी एक नव्हे, तर दोन पुतण्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होतो. पण दोघेही विजयी झाले आहे. हेच त्यांना दणदणीत उत्तर मिळाले आहे, अशी भाषा प्रा. शिवाजी सावंत यांनी बंधू माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्यावर केली होती. या भाषेवर दोन्ही भावामधील राजकीय वाद किती टोकाला गेला होता. हे दिसून येत आहे. माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि प्रा. शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांच्यातील गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या मतभेदांवर आता पडदा पडला आहे. दोन्ही भावांचे मनोमिलन झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ. तानाजी सावंत, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत आणि वाकवचे माजी सरपंच ऋतुराज सावंत यांचे एकत्रित छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या छायाचित्रामुळे सावंत कुटुंबातील कौटुंबिक तसेच राजकीय मतभेद आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1,158 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान
शिवाजी सावंतांपासून सावंत कुटुंबाची राजकीय ओळख
प्रा. शिवाजी सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी पक्षाच्या माध्यमातून काम सुरू केले. पुढे ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विरोधी पक्षनेते झाले. त्यांच्या राजकीय वाटचालीमुळे सावंत कुटुंबाची सोलापूर जिल्ह्यात स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण झाली. यानंतर प्रा. तानाजी सावंत यांनी शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून आपला विस्तार वाढवला. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना विधान परिषद सदस्यत्व मिळाले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर तानाजी सावंत हे शिंदे यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहिले. पुढे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या कुटुंबाने साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रातही दबदबा होता. परंतु भैरवनाथ शुगरच्या विभाजनानंतर दोघा भावांमध्ये वाद झाला. त्यानंतर राजकारणात वाद शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दोनवेळेस प्रवेश रद्द झाला होता. यामागे तानाजी सावंत असल्याचा आरोप शिवाजी सावंत यांनी केला होता. त्यामुळे दोघांमधील संघर्ष आणखी पेटला होता.
विराट आऊट झाल्यामुळे न जेवणाऱ्या नानांसाठी कोहलीची भावूक पोस्ट म्हणाला, एक खरे दिग्गज…
जिल्हा परिषद निवडणूक गाजली
धाराशिव आणि सोलापूर जिल्हा परिषद निवडणूकही सावंत बंधूमधील वादामुळे गाजली होती. तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज शिवाजी चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाले होते. ते माढा तालुक्यातील मानेगाव गटातून निवडून आले होते. तर दुसरे पुतणे हे धनंजय सावंत हे परंड्यातील जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. या विजयानंतर धनंजय सावंत यांनी काका तानाजी सावंतांना याद राखा, ही तांडवाची सुरुवात आहे, याद राखा अशी भाषा वापरली होती. बंधू, पुतण्यांनी बेछूटपणे काकांवर टीका केली होती.
अखेर कुटुंबातील मतभेद मिटले?
गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या मतभेदांना आता पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. 6 ऑक्टोबर रोजी तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यासह कुटुंबातील पुढील पिढीतील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र समोर आले. त्यामुळे सावंत कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक दुरावा कमी झाल्याचे मानले जात आहे.
कुटुंब… शेवटी कुटुंबच असतं !
या भेटीनंतर पुतणे ऋतुराज सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. सावंत परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी आणि भावनिक आहे. आदरणीय काका,राज्याचे माजी आरोग्य मंत्री व आमदार प्रा.तानाजीराव सावंत आणि आमचे वडील, ज्येष्ठ नेते प्रा.शिवाजीराव सावंत यांच्यातील गैरसमज दूर झाले आहेत. आमचं कुटुंब पुन्हा एकदा एकाच भक्कम चौकटीत एकत्र आलं आहे.
गेले काही दिवस सावंत कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. परंतु, कुटुंबाची नाळ आणि रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा खूप मोठी असतात. आज काकांनी माझ्या आणि माझे मोठे बंधू पृथ्वीराज भैय्या यांच्या खांद्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा जो हात ठेवला, तो आम्हा दोघांसाठी एका मोठ्या जबाबदारीचा आणि कृतज्ञतेचा क्षण होता. हे कुटुंब केवळ एक नाव नाही, तर शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उभा केलेला मोठा डोलारा आहे. कुटुंबात दुरावा निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना आज सडेतोड उत्तर मिळाले आहे. तात्पुरत्या वादळांनी सावंत कुटुंब कधीही डगमगणार नाही. आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्रच राहू असे म्हटले आहे. सध्या तरी दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. ते पुन्हा एका पक्षात येतात हे ही बघणे महत्त्वाचे असणार आहे.