तैलचित्राचं अनावरण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, आदित्य ठाकरेंची टीका
औरंगाबाद : आज विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचं अनावरण होणारंय. त्यापूर्वीचं या सोहळ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळताहेत. त्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारंय. तर ‘माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण होतंय, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळं राज्य मागं गेलंय. राज्य ओके नाही पण हे ओके होऊन बसलंय. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील तेवढं आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण विधिमंडळात केलं जाणारंय.
या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण झालं असं माझे आजोबा म्हणतील अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलीय. शिवाय घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचं अनावरण होणार असल्याचं सांगत त्यांनी यावर आक्षेपही घेतलाय.
पुढे आदित्य म्हणाले की, कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात? तुम्ही असं काय खाल्लं होतं? जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूरवर जावं लागलं. ही टोळी उद्योगात घुसल्यानंतर आपलं काही खरं नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.