MLA Sanjay Gaikwad : आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो, तेव्हा तुम्ही गोधडीत झोपले होते…

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटातील नेत्यांकडून केला जातो आहे. यातच खरे शिवसैनिक कोण यावरुन आता नवा वाद रंगला आहे. यावर आता आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गायकवाड म्हणाले, दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी जो शिवसैनिक घडविला तोच सच्चा शिवसैनिक आहे. जे आम्ही आहोत तसेच आमचे सहकारी आहे, एकनाथ शिंदे आहेत हे खरे बाळासाहेबांच्या तालमी मधील शिवसैनिक आहे.
पण आता काही म्हणत आहेत की आम्ही कडवे शिवसैनिक आहोत. मात्र खरा शिवसैनिक हा काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून कधीच काम करू शकत नाही. जो खरा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक असेल तो भगव्या झेंड्या खालीच काम करेल, तो कधीच राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या सोबत काम करणार नाही.
गायकवाड म्हणाले,जेव्हा आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो तेव्हा तुझी गोधडीत झोपले होते. तेव्हा तुमचा राजकीय जन्म पण नव्हता. तुमच्या राजकीय जन्मापासून आम्ही रक्त सांडले. तुळशीपत्र घरावर ठेऊन बाळासाहेबांसोबत पक्ष वाढविला. तुम्ही तेव्हा होता कुठं?, असा सवालही त्यांनी विचारला.
जे काही म्हणतायत सत्तेचा माज आला आहे, तसेच सत्तेची हुकूमशाही चालवत आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की तुमच्यात धाडस होत का एवढ्या वर्षात कलम 35 A हटवण्याची, राम मंदिर बनवण्याची हिंमत होती का? असा सवाल यावेळी गायकवाड यांनी विरोधकांना केला आहे. तसेच हे हुकूमशाही सरकार नाही तर हे धाडसी निर्णय घेणारे सरकार आहे. म्हणून आम्ही भाजप सरकार सोबत आहोत, असे आमदार गायकवाड म्हणाले आहे.
दरम्यान नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील एका सभेत शिंदे गटावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना लांडगे म्हणून संबोधले होते. तसेच ठाकरे गटासोबत राहिलेल्यांना कडवे शिवसैनिक उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता याच मुद्द्यावरून शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.