‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’ उदय सामंत यांचा जयकुमार गोरेंना टोला!
Uday Samant on Jaykumar Gore Sachin Sanap: उदय सामंत यांनी सचिन सानप यांना कमी लेखल्यावरून जयकुमार गोरेंना टोला लगावला.
Uday Samant on Jaykumar Gore Sachin Sanap: निवडणुकीत एखादा उमेदवार छोटा आहे म्हणून त्याला कमी लेखणे योग्य नाही. सत्तेचा गर्व बाळगून आपणच बोलू ते खरं, अशी भूमिका घेणाऱ्यांना मतदार उत्तर देऊ शकतात. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतून हे दिसून आले आहे, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सुनावले. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारासाठी सामंत सोलापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी गोरेंच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली.
‘कोण सचिन सानप?’ या वक्तव्यावर सामंतांचा पलटवार
काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांनी सचिन सानप यांच्याबाबत बोलताना, ‘कोण सचिन सानप? मी त्यांना ओळखत नाही,’ असे विधान केले होते. यावरून सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. लोकशाहीमध्ये प्रत्येक उमेदवाराला सन्मान मिळायला हवा. एखाद्याला कमी लेखणे किंवा त्याची खिल्ली उडवणे योग्य नाही. सत्तेत असल्याने आपलेच म्हणणे बरोबर, असा समज करून घेऊ नये, असे सामंत म्हणाले.
सानप यांना आज कोणी ओळखत नसेल, तर निवडणुकीनंतर त्यांची ओळख होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. सचिन सानप यांना निवडणूक लढवण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना योग्य ती मर्यादा पाळली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या निकालाचा दाखला देत इशारा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा दाखला देत सामंत यांनी सत्ताधाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीच्या पॅनेलचा 13 विरुद्ध 12 अशा फरकाने पराभव केला होता. महायुतीकडून सर्व जागा जिंकण्याचा दावा केला जात असताना निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली.
ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्यात आज राजकीय संघर्ष; कोण कुणाला देणार प्रत्युत्तर?
याच निकालाचा संदर्भ देत सामंत म्हणाले की, सत्तेचा अतिरेक आणि विरोधकांना कमी लेखण्याची वृत्ती नुकसानकारक ठरू शकते. पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही भारत-पाकिस्तानमधील लढाई नसून मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला कमी लेखू नये. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांशी संयमाने वागणे गरजेचे आहे. सर्वांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घेतली तरच महायुतीला फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला
27 तारखेला निकालातून उत्तर मिळेल?
सचिन सानप हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सानप यांच्यासाठी प्रचार करताना सामंत यांनी गोरेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. सत्तेत असलेल्या नेत्यांनी एकमेकांच्या उमेदवारांचा सन्मान राखावा, असे सांगत त्यांनी गोरेंना सबुरीचा सल्ला दिला. 27 तारखेला निकाल लागल्यानंतर सानप कोण आहेत, हे कळेल, असे म्हणत सामंत यांनी निवडणुकीत काहीही घडू शकते, याची आठवण करून दिली.