Uddhav Thackeray : निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते ते विकले गेले, ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते ते विकले गेले, ठाकरेंचा हल्लाबोल

ठाणे : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच आज शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका पाहता यावेळी ठाकरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या राज्यात विकृतपणा तसेच गलिच्छपणा राजकारणामध्ये आला आहे. हे समोर दिसत असताना देखील शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेली नाही याच मला अभिमान आहे. अन्यायाला लाथ मारायची आहेच, पण 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आपण विसरलेलो नाही.

राजन विचारे त्यांचे शिलेदार निष्ठावंत शिवसैनिक इथे आहेत. बाकी विकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही. सध्या राहुल गांधी यांची यात्रा काश्मीर मध्ये सुरु आहे. तिकडे संजय राऊत गेले होते. तिकडे देखील म्हणजेच काश्मीरपर्यंत 50 खोके ही घोषणा पोहोचली आहे. नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची बदनामी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या गोष्टी पोहचल्या आहेत.

निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते ते विकले गेले. हे महाराष्ट्राची व शिवसेनेची बदनामी आहे. गेले त्यांचा काही दुःख नाही आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत आहेत. उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केला.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे भाषण करायला उभा नाही, मात्र लवकरच भाषण करायला येणार आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube