Uddhav Thakeray : देशातील लोकशाही संपली… पंतप्रधानांनी हुकुमशाही घोषीत करावी!
पुणे : देशातील लोकशाही संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आता देशात हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे, असे जाहीर करावे. आज केंद्रीय निवडणूक (Central Election Commission) आयोगाने शेण खाल्लं आहे. दहशत, पैशाच्या जोरावर निर्णय द्यायचा होता तर मग आम्हाला पुरावे का मागितले. आधीच निर्णय द्यायचा होता. एवढा खटाटोप करण्याची काहीच गरज नाही. राम आणि रावण अशा दोघांकडे धनुष्यबाण होता. परंतु, रामायणात विजय हा रामाचा झाला आहे, हे विसरू नका. त्यामुळे कितीही कौरवांना घेऊन आमच्यावर हल्ला केला तरी शेवटी पांडवच भारी पडले, हाही इतिहास भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गद्दारांनी विसरू नये. तर जनता गद्दारांना धडा बरोबर शिकवेल. त्यामुळे सच्चा शिवसैनिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण येणाऱ्या काळात विजय आपलाच होणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी शिवसैनिकांना दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात नरेंद्र मोदी हे नाव चालत नाही, हे भाजपला पूर्णपणे समजले आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, चिन्ह गद्दारांच्या मदतीने चोरून वापरत आहेत. मात्र, ही चोरी फार काळ टिकणार नाही. या देशातील जनतेने जसे इंदिरा गांधी यांना धडा शिकवला आहे. तसा धडा भाजप आणि गद्दारांना जनता शिकवेल.
चोराला राजमान्यता देणे हे काही लोकांना भूषणावह वाटत असेल. पण एक सांगतो चोर हा चोरच असतो. हेही विसरता येणार नाही. कदाचित भविष्यात देखील आमची मशाल देखील काढून घेतील. पण तुम्हाला सांगतो की आता मशाल पेटली आहे. आता आरपारची लढाई सुरु झाले आहे, हिम्मत सोडू नका विजय आपलाच आहे, असा विश्वास शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी दिला.