विखेंचं सत्यजित तांबेंना पाठबळ तर थोरातांसाठी धोक्याची घंटा…

विखेंचं सत्यजित तांबेंना पाठबळ तर थोरातांसाठी धोक्याची घंटा…

नाशिक : येत्या 3 जानेवारीला होत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पार पडत असलेल्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी एक प्रकारचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सलग तीन वेळा नेतृत्व करत असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी मुलगा सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.

आज दुपारर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, मात्र दुपारनंतर गेम पलटी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. सुधीर तांबे यांच्या नावावर कॉंग्रेसच्या महासचिवांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र, सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्मचा स्वीकार केला नाही. याउलट त्यांनी ही उमेदवारी सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

आज दुपारच्या सुमारास सत्यजित तांबे यांचा अर्ज भरण्यात आला आहे. सत्यजित तांबे यांनी एक महाविकास आघाडीकडून अर्ज भरला खर पण अर्जासोबत त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. तसेच त्यांनी दुसरा अपक्ष देखील अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की, मी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून आम्ही नुकताच महाविकास आघाडीच्यावतीने माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मी भाजपसह, रासप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून मदत करण्याची विनंती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे उमेदवार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं वक्तव्य केलंय. विखे यांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा दर्शवल्याने याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंय.

सत्यजित तांबे हे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष असताना राज्यभर पक्षाची मोट बांधण्याचं काम केलंय. 2014 मध्ये सत्यजित तांबे यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना यश मिळालं नाही. अखेर थोरात यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे राधाकृष्ण विखे यांनी सत्यजित तांबे हे आमदार होण्यासाठी पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले विखे?
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे उमेदवार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल. तांबेंनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविली तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर मतदासंघातून भाजपचा उमेदवार सत्यजित तांबे असणार असे संकेतही विखे यांनी दिलेत. संगमनेर मतदारसंघ हा सत्यजित तांबे यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातं. मात्र, विखे यांच्या या संकेतानंतर बाळासाहेब थोरात यांना धोक्याची घंटा असल्याची चर्चा केली जात असल्याचं दिसून येतंय.

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजप-शिंदे गटाकडून विधान परिषदेची ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून अद्याप भाजपकडून उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र ही चर्चाच राहिली. तर खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधरसाठी इच्छा दर्शवली आहे. अखेर आता भाजपचा चेहरा कोण असणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले बाळासाहेब थोरात यांच्यासाठी सत्यजित तांबे यांची पदवीधर मतदारसंघाची ही उमेदवारी धोक्याची घंटा समजली जात असल्याच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात विधान परिषदेसाठी येत्या ३० जानेवारीला मतदान पार पडणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच विधानपरिषदेच्या आमदारपदी कोणाची वर्णी लागणार? हे स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube