ज्या पक्षासोबत भाजप त्यांच्यासोबत आम्ही नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका
“आम्ही सध्या भाजपसोबत युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षालाही पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गटाने जर भाजपसोबत युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू” असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गटासोबत युतीच्या चर्चेला विराम दिला आहे.
मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर नककी कोणाशी युती करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. उद्भव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गटासोबत त्याच्या चर्चा चालू असल्याचं बोललं जात होत. अशातच बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोघांमध्ये तब्बल अडिच तास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं होतं.
त्यावर अखेर आज पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्षट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रत्येक भेट ही राजकीय नसते, मी इंदू मिलमधील स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
ठाकरे गटासोबत युतीला तयार पण…
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युतीला तयार असल्याचं म्हणत शिंदे गटासोबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला. ते म्हणाले कि, “आम्ही ठाकरे गटासोबत युती करण्यास तयार आहोत. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे यांनी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत घोषणा करावी. आम्ही सध्या भाजपसोबत युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षाला पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गटाने जर भाजपसोबत युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू.”