कुठं फेडणार हे पाप, सभागृहात अजित पवार कडाडले
नागपूर : करोडो रुपयांचे कॉट्रॅक्ट घेऊन आमदार निवासाच्या स्वच्छतागृहामध्ये चहाचे कप भांडी धुण्याचे प्रकार उघडकीस आल्यानं यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात कडाडल्याचं चित्र पाहायला मिळालंय. ते म्हणाले, हा कसला नालायकपणा सुरु आहे, कुठं हे पाप फेडतील? नागपूरच्या आमदार निवासाचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी पवार यांनी केलीय.
ते म्हणाले, दोन वर्षाच्या खंडानंतर नागपूरमध्ये अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातून आमदार या अधिवेशनासाठी आले आहेत. आमदार ज्या ठिकाणी थांबतात त्या आमदार निवासाची व्यवस्था म्हणजे फक्त एन्ट्रीला मेकअप आणि आत रुम एकदम खराब आहेत. या आमदार निवासमधील स्वच्छतागृहात चहाचे कप आणि भांडी धुतली जात आहेत.
विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच अनेक माध्यमांनी सुध्दा याची दखल घेतली आहे. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपयांचे कॉट्रॅक्ट दिले जाते. तरीही असे गैरप्रकार सुरु आहेत. पोलिसांनासुध्दा पहिल्या दिवशी जेवण मिळाले नाही. ते किती तास ड्युटी करतात हे कोणाला माहित नाही.
हा कसला नालायकपणा सुरु आहे. कुठं हे पाप फेडतील ? हा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा बगलबच्चा आहे ? असा संतप्त सवाल करीत त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, सरकारचे लक्ष आहे कुठे? असा सवाल करत या सर्व गोष्टींना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं चित्र दिसून येत आहे. दिशा सालियन प्रकरणी भाजपच्या विधानसभा सदस्यांकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.