Nashik Graduate Constituency Election : ‘मविआ’चा पाठिंबा कुणाला? नाना पटोले स्पष्टच बोलले…
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात दररोज नवीन ट्वीस्ट येत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडतांना दिसत आहेत. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) नाशिक पदवीधरसाठी डॉ.सुधीर तांबेंना (Dr. Sudhir Tambe) उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु, अर्ज दाखल करण्याच्या वेळेस डॉ. तांबे यांनी स्वत:चा अर्ज दाखल न करता पुत्र सत्यजित तांबेंचा (Satyajit Tambe) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला होता.
एकीकडे वडिलांना उमेदवारी जाहीर झालेली असतांना मुलाने प्रतिक्रिया न दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यावरुनच पदवीधर मतदार संघात भाजपकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने याबाबत हायकमांडकडे तक्रार दाखल केली होती.
त्यावर काँग्रेस हायकमांडने तात्काळ निर्णय घेत डॉ. सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यावर ठाकरे गटाने होकार दर्शवत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. पंरतु, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती. यानंतर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट करत शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत मोठे विधान केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे यांच्या संदर्भात जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल.आमचा जो निर्णय झाला आहे, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच नागपूरची (Nagpur) जागा काँग्रेसला देण्यात आली असून नाशिकमध्ये (Nashik) शुभांगी पाटील या महाविकासआघाडीच्या उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले आहे.