चंद्रकांत पाटलांवर गुन्हा का दाखल करत नाही? : नाना पटोले
नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांच्यापासून महापुरुषांचा अपमान करण्याचे काम सुरु झाले आणि त्यानंतर भाजपा नेत्यांमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच लागली.
भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापुरुषांनी भीक मागितली अशी भाषा वापरून त्यांची बदनामी केली, अपमान केला. सातत्याने महापुरुषांचा अपमान करूनही भारतीय जनता पक्षाने या वाचाळविरांवर कारवाई केली नाही हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरुच राहील.