अजितदादांचा पक्षप्रवेश होणार का? बावनकुळे म्हणाले, ‘पक्षप्रवेशासाठी कोणालाही नकार नाही पण…’
Chandrasekhar Bawankule on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंप होईल अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकते आणि अजित पवार नवे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावरुन अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. या चर्चेंवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षप्रवेशासाठी कोणालाही नकार नाही पण आमच्याकडे आजपर्यंत अजितदादांचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पक्षप्रवेशासाठी कोणालाही नकार नाही. आम्ही राजकीय पक्ष आहेत. पक्ष वाढवणे हे आमचे कामच आहे. भाजपची विचारधारा स्विकारून कोणी येत असेल तर स्वागत आहे पण आमच्याकडे अजितदादांच्या पक्षप्रवेशाचा आजपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा चर्चा देखील झाली नाही, असे बावनकुळे म्हणाले. ते पुढं म्हणाले की आता आमच्यासमोर असा कोणताही विषय नाही. अजित पवार यांचा पक्षप्रवेश होणार आहे का? त्यांना कोणत्या पक्षात जायचे आहे? याबद्दल मला काहीच माहिती नाही. याबद्दल अजितदादाच सांगू शकतात, असे त्यांनी सांगितले.
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल… विधानभवनातून अजित पवारांचा राऊतांवर रोख…
उद्धव ठाकरेंची राजकीय आत्महत्या
उद्धव ठाकरेंना 2019 मध्येचं राजकीय आत्महत्या केली होती. सत्तेच्या नशेकरता, मुख्यमंत्री पदाचा हव्यास झाला होता. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री होण्याची लालच होती यासाठी त्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला. जेव्हा विश्वासघात होतो त्यावेळी नैसर्गिक पद्धतीने बदला घेतला जातो. आम्हाला काही गरज पडत नाही, जनताच बदला घेते. आता उद्धव ठाकरेंना वाटते की मी एकटाच राहील. ते खर आहे, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष त्यांना सोडून जातील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!
ते पुढ म्हणाले की पहाटेच्या शपथविधीच्या वेळी भाजपचा राष्ट्रवादीने विश्वासघात केला याचा बदला घेतला जात आहे का? यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ऑपरेशन लोटस वैगरे काही नाही. लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. मोदींचा चेहरा वापरुन निवडणुका लढले आहेत. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी आमचा विश्वासघात केला असे वाटत नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे. सत्ता येण्यासाठी त्यांना जे करता येईल ते त्यांनी केले.