‘2024 नंतर नरेंद्र मोदी निवडणुका घेतील का?’ विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?
Narendra Modi politics : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत असा संशय विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. विरोधाकांच्या या आरोप तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मागील नऊ वर्षातील राजकारण आणि विरोधीपक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर थेट उत्तर दिले. ते म्हणाले की 2019 मध्ये देखील असे म्हटले जात होते की 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत. आता पुन्हा तेच बोलले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचा संशय निर्माण करण्याला काही अर्थ नाही. तो एक प्रचाराचा भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रशांत दीक्षित म्हणाले की 2019 साली म्हटले जात होते की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर 2024 ला निवडणुका होणार नाहीत. आता देखील असं म्हटलं जातंय की 2024 ला निवडून आले तर 2029 ला निवडणुका होणार नाहीत. त्यांच्या या आरोपाचे मला आर्श्चय वाटतं. पण असा आरोप करणे म्हणजे प्रचाराचा एक भाग असतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात लोकशाही आणि स्वातंत्र्याला महत्व आहे. मुळात हिंदू धर्मात स्वातंत्र दिलेले आहे. तु देवाला मान किंवा मानू नको हे याचे प्रत्येकाला स्वातंत्र आहे. त्यामुळे लोकशाहीवर एकदम हल्ला होणं किंवा निवडणुकाच होणार नाहीत असं नजीकच्या काळात तरी होणं शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदींपासून लोकशाहीला धोका नाही, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षितांचे थेट उत्तर
ते पुढं म्हणाले की ज्या देशात हुकूमशाहा निर्माण झाले त्याठिकाणी एकतर ते देश छोटे होते किंवा एका वंशाचे लोक होते. आपल्याकडे तसं नाही. हिंदू लोक जरी आपल्याकडे संख्येने जास्त असले तरी महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे हिंदू म्हणजे अनेक जातींचा समूह आहे. त्यामुळे असं वाटतं की आपल्या देशात लोकशाही जास्त काळ राहाणार आणि निवडणुका होत राहातील. कदाचित 2024 मध्ये मोदींना आव्हान दिले जाऊ शकते किंवा अल्पमतात देखील जाऊ शकतात. मी अजून तरी देशाकडे साकारात्मक दृष्टीने बघतो, असे प्रशांत दीक्षित यांनी म्हटले आहे.