सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन अन् अजितदादा संजय काकडे झाले जिगरी दोस्त!
Sanjay Kakde Wish Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (दि.22) वाढदिवस. दोन्ही नेते त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादा पवार यांच्या इतका प्रशासनावर पकड असणारा व मैत्रीला जागणारा दुसरा नेता नसल्याचे म्हणत भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांच्या स्वभावाविषयी आणि दोघांच्या मैत्रीलादेखील उजाळा दिला आहे.
अजितदादांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना संजय काकडे म्हणाले की, अजितदादा म्हणजे कुशल नेतृत्व, चांगला वक्तृत्व असणारे आणि स्पष्टवक्ता नेता…. काटेकोर काम आणि प्रशासनावर पकड ही त्यांच्या कार्यपद्धतीची खास वैशिष्ठ्ये आहेत. यामुळं महाराष्ट्रात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन अन् अजितदादा संजय काकडे झाले जिगरी दोस्त!
अजितदादा आणि माझी मैत्री कशी झाली यावर बोलताना संजय काकडे म्हणाले की, अजितदादा आणि माझी ओळख १९९७ साली झाली. प्रा. रामकृष्ण मोरे सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. माझ्या सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन करण्यासंदर्भात अजितदादांना निमंत्रित करण्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हापासून आमची मैत्री सुरु झाली. मला विशेष आनंद याचा आहे की आजही आमची मैत्री कायम असल्याचे काकडे यांनी यावेळी सांगितले.
अजितदादा मित्रांना विसरत नाही
यावेळी काकडेंनी अजितदादांचा एक खास गुणदेखील सांगितला. ते म्हणाले की, अजितदादांचा एक गुण खूप खास आहे. ते मित्रांना विसरत नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या पाठीशी ते कायम उभे राहतात. कार्यकर्त्यांना ताकद देतात. आमच्या दोघांच्या मैत्रीतही त्यांनी कधीच अंतर पडू दिले नाही. ज्या-ज्यावेळी मला मदत लागली तेव्हा ते आमच्या मैत्रीला जागले आणि माझ्या मदतीला आले आणि मीदेखील त्यांच्या मैत्रीला कधी अंतर दिले नाही.
अजितदादांमध्ये तत्काळ अंमलबजावणी करण्याची हातोटी
पुढे बोलताना काकडे म्हणाले की, गेली ३२ वर्षे अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असून बारामती विधानसभा मतदार संघातून सलग सातवेळा ते जिंकून आले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री आदी विविध खात्यांचे मंत्रिपद म्हणून काम करताना त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागाची, शेती, सहकारसह उद्योग, व्यापार अशा बहुतांश सर्वच क्षेत्राची अजितदादांना बारकाईनं माहिती आहे. त्यामुळं निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये दिसते.
अजितदादा म्हणजे वक्तशीरपणा
अजितदादा म्हणजे वक्तशीरपणा. सकाळी सात वाजता ते लोकांना भेटतात व कामाला लागतात. सर्वसामान्य माणसालादेखील ते सहज उपलब्ध असतात. अजितदादांच्या याच गुणांचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होवो. त्यांच्या हातून राष्ट्राची महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो ! आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा देत संजय काकडेंनी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.