लाडक्या बहिणीला अजितदादांकडून मोठी जबाबदारी; पुनम विधाते पुणे शहराच्या नव्या कार्याध्यक्षा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्षपदी पुनम विधाते (Poonam Vidhate) यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याहस्ते विधाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. (Appointment of Punam Vidhate as the Working President of Pune City of Nationalist Congress Party)
पुनम विधाते यांचे वामा वुमेन्स क्लबच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणात मोठे काम आहे. याशिवाय त्यांचे पती विशाल विधाते हेही मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय असून त्यांच्यावर प्रभाग क्रमांक नऊची जबाबदारी आहे.
दरम्यान, या निवडीबाबत बोलताना पुनम विधाते म्हणाल्या, समाजासाठी काम करत असताना आपण पूर्णपणे झोकून देऊन काम करत असतो. लोकांना भेटत असतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण सामाजिक कामाला राजकीय किनार असेल तर कामांचा वेग दुपटीने वाढतो हा आजवर मी घेतलेला अनुभव आहे.
आज महिलांसाठी महिलांचे प्रश्न मांडताना महिलांना सक्षम करण्यासाठी आपण पहिली सुरवात स्वतःपासूनच करायला हवी असं वाटतं. आज खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे जात एक नवीन आव्हानं, नवीन जबाबदारी घेत समाजपयोगी कामे करणार आहे, असेही विधाते यांनी सांगितले.