चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन असावे; अर्जुन धवन निकमार विद्यापीठात 9व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Nikmar University : “विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता येतील. भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील, त्यावेळी शहराचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल,” असे विचार हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांनी व्यक्त केले. देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिले अग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट (ICCRIP) या विषयावरील दोन दिवसीय 9व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सीडीआयआरचे महासंचालक अमित प्रोठी, निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व चीफ पॅट्रन प्रा. डॉ. विजय गुपचूप, पॅट्रन व कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी, इंटरिम डायरेक्टर जनरल डॉ. तपश कुमार गांगुली आणि परिषदेचे समन्वयक व संशोधन-विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस उपस्थित होते.
अर्जुन धवन म्हणाले, “देशातील या उद्योगात अमूलाग्र परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानाने चालणारे हे क्षेत्र प्रचंड वेगाने बदलत आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता, नावीन्यता आणि शाश्वतता यांचा समावेश आहे. भारतीय बांधकाम बाजारपेठ 2025 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार असून तिचे मूल्य 1.4 ट्रिलियन डॉलर्स असेल. देशात रस्ते आणि मेट्रो नेटवर्कचा विस्तार होणार आहे. त्यामुळे मजबूत राजकीय नेतृत्व तसेच इंजिनियर्स आणि सिटी प्लॅनर्सची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.”
“स्थापत्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा हा आपल्या जीवनपद्धतीचा कणा आहे. या सुविधांमुळे देशाच्या आर्थिक व सामाजिक आकांक्षांना योग्य दिशा मिळते. या क्षेत्रातील गुंतवणुकीचा आर्थिक विकासावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्थापत्य ज्ञान, प्रकल्प समन्वयाची शिस्त आणि टिकाऊपणाची भूमिका अंगीकारणे गरजेचे आहे.”
अमित प्रोठी म्हणाले, “विकसित भारतासाठी 2050 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च पायाभूत सुविधा व गुंतवणूक सेवांवर होईल. नैसर्गिक आपत्ती व हवामान बदलांना तोंड देण्यासाठी क्षमता वाढविणे, नवीन धोरणे तयार करणे आणि नियोजन-व्यवस्थापन यावर अधिक भर दिला जाईल. यामुळे ३ अब्जाहून अधिक लोकांचे जीवनमान सुधारेल. आपत्तीनंतरच्या पुनर्प्राप्ती आणि कृतीसाठी सरकारी, खाजगी उपक्रम आणि समुदायांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.”
डॉ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या, “आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन अधिक सुखमय झाले आहे. बांधकाम क्षेत्रातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. या क्षेत्रातील संशोधन, केस स्टडी, स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करता येतो. गुजरातमध्ये झालेल्या पुलाच्या दुर्घटनेत योग्य मेंटेनन्स न केल्याचे कारण समोर आले होते. अशा घटना टाळण्यासाठी सिव्हिल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि नव्या बदलांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे.”
प्रा. डॉ. विजय गुपचूप म्हणाले, “निकमारला 2022 मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला. सतत बदलणाऱ्या या क्षेत्रात विद्यापीठाने उद्योग, अकादमिक क्षेत्र, ज्ञान क्षेत्र, संशोधन आणि इनोव्हेशन यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यावर भर दिला आहे.”
डॉ. तपश कुमार गांगुली म्हणाले, “लोकांचे जीवन सुचारू व आनंददायी करण्यासाठी बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून उत्कृष्ट स्मार्ट सिटींची निर्मिती शक्य आहे. निकमारने आयोजित या परिषदेत विद्यार्थ्यांना संशोधन, धोरण आणि तंत्रज्ञानाची अत्याधुनिक माहिती मिळेल.”
डॉ. रजनीकांत राजहंस यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, “या परिषदेत 18 देशांतील 200 हून अधिक संशोधन पेपर सादर केले जात आहेत. सहा प्रमुख श्रेणींवर लक्ष केंद्रित असलेल्या परिषदेत संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर्सचे दृष्टिकोन, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉनचा समावेश आहे.”एल अँड टीचे कार्यकारी समिती सदस्य व अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार एम. व्ही. सतीश हे ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “देशाच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा 8 ते 9 टक्के वाटा आहे.”