पीसीसीआयच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीच्या संधींची उपलब्धता : टोकियोस्थित उद्योजक डॉ. प्रमोद वाहने यांचे मत
Pramod Vahane: आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न पीसीसीआय च्या माध्यमातून केला जाईल.
पुणे : भारतातील विविध स्रोतांची उपलब्धता आणि जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून, आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न ‘प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) च्या माध्यमातून केला जाईल. पीसीसीआय द्वारा जपानची औद्योगिक शिस्त व व्यवस्थापनाचे कौशल्य, यांचेही मार्गदर्शन युवा पिढीतील उद्योजकांना मिळवून देण्यात येईल,” असे प्रतिपादन टोकियो स्थित व्हानेज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. प्रमोद वाहने यांनी येथे केले. (Availability of economic growth opportunities through PCCI: Opinion of Tokyo-based entrepreneur Dr. Pramod Vahane)
प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारत-जपान बिझनेस मीट-2025च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी टोकियो येथील ग्रीन रिन्यूएबल एनर्जी इंकचे सीईओ एन. डोवाकी, तसेच टेक्निकल एक्स्पर्ट सकामोटो, पीसीसीआयचे अध्यक्ष, लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पेरिया बिल्टकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉ. भगवान गवई, पीसीसीआयचे संचालक प्रा. दीपक बागडे, पीसीसीआयचे संचालक अॅड. ओमप्रकाश मौर्य, संचालक जितेंद्रकुमार, जिगर सोसा, राकेश जोशी, राज्याचे माजी सचिव रत्नाकर गायकवाड, ग्रीन सोल्यूशन्सचे संचालक सागर अहिवले, कुणाल लोहिया, महेंद्रपाल सिंग, डॉ. प्रकाश पवार, डॉ. गिरीश इंगळे, अविनाश जगताप, डॉ. विजय कदम, संजीवनी गवई, सौरभ गवई, सागरिका गवई, पंकज जाधव, डॉ. लता शेप, विनय दवे, राकेश जोशी, प्रमोद वाकोडे, प्रसाद वाकोडे, जयंत रामटेके, डॉ. मंगेश शिंदे, देवेंद्र तायडे व पीसीसीआय आणि व्यावसायिक महिला, पुणेच्या संचालिका विशाखा गायकवाड उपस्थित होत्या. (
डाॅ. प्रमोद वहाणे म्हणाले, “भारत आणि जपान, या दोन्ही देशांतील सकारात्मक घटकांमध्ये दुवा साधून, नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. जपानमध्ये विकसित झालेले, पण जगासमोर न आलेले तंत्रज्ञान आणि भारतात उपलब्ध असणारे स्रोत, यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक उन्नतीच्या, नव्या व्यवसायांच्या तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांच्या नव्या श्रेणी विकसित करण्याचा मानस आहे. जपानने संशोधनातून विकसित केलेल्या तंत्रस्नेही उत्पादनांसाठी भारतातील विविध स्रोत, तसेच कुशल मनुष्यबळ, जागेची उपलब्धता आणि उद्योजकीय मानसिकता पूरक ठरेल. जपान व भारत या देशांत भांडवली गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या उत्सुक आहेत. या परिषदेसाठी जपानचे शिष्टमंडळ सोबत आहे. कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. पर्यायी इंधनाचा एक संभाव्य स्रोत म्हणून त्याकडे पाहता येईल. दोन्ही देशांच्या केंद्रीय यंत्रणांनी अनुकूलता दर्शवून पीसीसीआयचे मनोबल वाढवले आहे”.
एन. डोवाकी म्हणाले, पर्यावरणीय संतुलन आणि पर्यावरणपूरक उत्पादने, ही नव्या काळाची गरज आहे. त्यामुळे हरित उर्जा, हरित तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन सुरू असून ग्रीन हायड्रोजन हे पुढचे पाऊल ठरेल. त्यासाठी भारतातील उद्योजक, स्रोतसमृद्धता महत्त्वाची ठरेल. ग्रीन टेक हे स्टार्टअप कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्पावर काम करत असून आमचे भागीदारही भारतात आहेत.
डॉ. भगवान गवई म्हणाले, “पीसीसीआयची सुरवात प्रामुख्याने उद्ययोन्मुख उद्योजकांसाठी केली आहे. सुरवातीला देशातील १० राज्यांतील ४५ जिल्ह्यांमधून पीसीसीआयने ४५ दिवसांचे आर्थिक सशक्तीकरण अभियान राबविले. डेटा गोळा करून विश्लेषण केले. नवे तंत्रज्ञान, गुंतवणुकीच्या नव्या वाटा, नवोन्मेष घेऊन येणाऱ्या युवा उद्योजकांना, दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारीची संधी मिळावी त्यासाठी आवश्यक सर्व घटक एकाच व्यासपीठावर उपलब्ध असावेत. या उद्देशाने पीसीसीआय कार्य करेल. तसेच केवळ शहरी उद्योगांवर भर न देता, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील उद्योजकीय शक्यतांनाही प्राधान्य दिले जाईल.
विशाखा गायकवाड म्हणाल्या, “ही परिषद केवळ एका इव्हेंटपुरती मर्यादित नाही. युवा तसेच नव्या उद्योजकांना योग्य ती दीर्घकालीन मेंटारशिप मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती व्हावी, पतपुरवठा, भांडवली गुंतवणूक यासाठीचे विश्वासू सहकारी मिळावेत, सध्या दिसणारी आर्थिक असमानता कमी व्हावी, असे अनेक उद्देश या आयोजनामागे आहेत. मुख्य म्हणजे सर्वसमावेशक असा दृष्टीकोन ठेवून पीसीसीआय कार्य करीत आहे”. सूत्रसंचालन दीपक बागडे आणि डॉ. विजय कदम यांनी केले. विशाखा गायकवाड यांनी आभार मानले.
