Explainer Baramati Loksabha : ना कुल, ना जानकर… सुप्रिया सुळें विरोधात भाजपचा उमेदवार ठरला!
पुणे : भारतीय जनता पार्टीने सन २०१४ पासून बारामती लोकसभा जिंकण्याचा चंग बांधला आहे. मात्र, अद्याप भाजपला त्यामध्ये यश आलेले नाही. आता पुन्हा एकदा भाजपने बारामती जिंकण्याचा एल्गार केला आहे. काल झालेल्या सभेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात बारामती लोकसभा लढवणारा भाजपचा उमेदवार हा नशिबवान असणार आहे, असे वक्तव्य केले. त्यामुळे ना महादेव जानकर, ना कांचन कुल, तर सुप्रिया सुळे विरोधात बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार ठरला आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून निवडणुकीत उतरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना झाल्यास कोण विजयी होईल? याकडे आतापासूनच लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील किंवा त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील यांचे हर्षवर्धन पाटील हे पुतणे आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी चार वेळा इंदापूरचे आमदार म्हणून काम केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे.
Gautami Patil, इंदुरीकर महाराज ते शिवलीला पाटील कोण किती पैसे घेतं? – Letsupp
भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून बारामती जिंकण्याचा एल्गार केला. त्या निवडणुकीत भाजपने महादेव जानकर यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता. परंतु, महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास ठाम राहिले. परंतु, महादेव जानकर यांनी भाजपच्या मदतीने ही निवडणूक लढवली. पण त्या वेळी महादेव जानकर यांचा आवग्या ५७ हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना निवडणुकीत उतरवले. मात्र, त्यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा दंड थोपटले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे हर्षवर्धन पाटील हे किती टक्कर देणार हे पाहावे लागणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात याबाबत सांगतात की, पुणे जिल्ह्यातून दीर्घकाळ मंत्रिपदावर राहिले असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे. त्यांना भाजपची जर मदत मिळाल्यास ते चांगली लढत देऊ शकतात, असे वाटते. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला आणि दौंड या दोन मतदारसंघात सध्या विरोधी पक्षाचे आमदार आहेत. याशिवाय पुरंदर आणि हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघात विरोधकांची चांगली ताकद आहे. त्याचबरोबर भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे सध्या ग्रामीण आणि शहरी अशी थेट विभागणी झाली आहे. शहरी भागांमध्ये भाजपच्या उमेदवाराला चांगली मतं मिळतात, असे २०१४ पासूनचा निवडणुकीतील अनुभव आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लढतीत येऊ शकतात. मात्र, बारामती, इंदापूर आणि पुरंदर या तीन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले लीड भरुन काढण्याची क्षमता हर्षवर्धन पाटील यांच्यात आहे का, हे पाहावे लागेल. मागील वेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना एक लाख साठ हजार पेक्षा जास्त लीड मिळाले आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात यांनी व्यक्त केले.