Kasba By Election : बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे रासनेंना आज झोपच लागणार नाही…
विष्णू सानप
पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.
ही उमेदवारी टिळक कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी ब्राह्मण समुदायाकडून केली जात होती. तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, भाजपने त्यांना डावलून रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावरून टिळकांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती.
दरम्यान, टिळक यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी केसरी वाड्यात जाऊन भेटीचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमकं याच मर्मावर बोट ठेवत टिळक कुटुंबियांवर भाजपकडून कसा अन्याय केलाय,असा प्रचार केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शैलेश टिळक यांची आज सायंकाळी केसरीवाड्यात जाऊन भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला तर आम्हीही टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देऊ, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कसब्याच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट आला असून आता उद्या तीन वाजेपर्यंत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बावनकुळे म्हणाले, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध याकरीता आम्ही सर्व पक्षांकडे विनंती केली आहे. मी व्यक्तिगतही विनंती करण्यासाठी देखील तयार आहे. मात्र, विरोधी पक्षांनीही तशी तयारी दाखवावी. ही निवडणूक फक्त नऊ ते दहा महिन्याचा कार्यकाळ राहिला असल्यामुळे बिनविरोध केली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. आम्हीही याआधी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन बिनविरोध केली होती. आता त्याच प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही निर्णय घ्यावा. त्यांना उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे. त्यांनी जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म काढून घेतला तर आम्हीही टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देऊ, असे स्पष्ट केले.
दरम्यान, बावनकुळे यांनी केलेल्या आजच्या वक्तव्यामुळे कसब्याची उमेदवारीची लॉटरी लागलेले हेमंत रासने यांची मात्र निराशा झालेली असणार, हे नक्की. कारण आमदारकीचा हाता-तोंडाशी आलेला घास महाविकास आघाडीच्या खेळीमुळे जातो की काय?, असा प्रश्न रासनेंना आज रात्रभर सतावत असणार. आता खरंचच महाविकास आघाडीचे नेते म्हटल्याप्रमाणे टिळक कुटुंबीयांना उमेदवारी दिली तर आपल्या उमेदवाराचा म्हणजे रवींद्र धंगेकर यांचा अर्ज माघारी घेतात की निवडणूक लढणार याकडे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
आज सकाळीच बावनकुळे यांच्या प्रमाणेच भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आम्ही टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देतो नाना पटोले यांनी आपल्या सहकारी पक्षांची समजूत काढत आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा,असे आवाहन केले होते.
दरम्यान, आता भाजपचे पत्ते उघड झालेत आहेत. मात्र, महाविकास आघाडी आता काय पत्ते टाकणार आणि काय डाव खेळणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.