‘जे बोलतो ते करतोच…!’ अविर्भाव धीरज घाटेंना महागात : पुणे भाजपला केंद्रीय नेत्यांनी झाप-झाप-झापले

‘जे बोलतो ते करतोच…!’ अविर्भाव धीरज घाटेंना महागात : पुणे भाजपला केंद्रीय नेत्यांनी झाप-झाप-झापले

पुणे : ललित कला केंद्रातील राडा आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांच्यावरील हल्ला पुणे शहर भाजपला चांगलाच महागात पडला आहे. पुण्यातील या दोन्ही ठिकाणच्या घडामोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. शैक्षणिक संस्थांसह पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद हे राष्ट्रीय स्तरावर उमटले. त्यामुळे निवडणूक जवळ (Lok Sabha Election) आली असताना पक्षाची प्रतिमा केवळ शहरातच नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशातही मलिन झाली, असे म्हणत केंद्रीय नेत्यांकडून शहर भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मागील आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये नाटक सादर करताना प्रभू श्रीराम, सीतेच्या वेशात अभिनय करताना काही अक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्या, त्यामुळे हिंदू धर्माचा अपमान केला, म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि उपस्थितांना मारहाण केली. तसेच केंद्राचीही तोडफोड केली. या प्रकाराची देशभरात चर्चा झाली. देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कलाकार मंडळींनी या राड्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

ससून रुग्णालयातून आणखी एक आरोपी पळाला; कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी

हे प्रकरण ताजे असतानाच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावर टीका केली, म्हणून भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठलाग करुन वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. भर रस्त्यात चार ठिकाणी चारवेळा हा प्रसंग घडल्याने त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. याची शहरभर आणि समाजमाध्यमावर अद्यापही चर्चा सुरू राहिली. यानंतरही धीरज घाटे यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून याबद्दल ‘आम्ही जे बोलतो ते करतोच…!!’ अशा आशयाची पोस्ट केली.

या दोन्ही घटनांवर सर्वच स्तरातून टीका झाली. विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांवर हल्ले झाल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. निवडणुका जवळ आल्या असल्याने केंद्रापासून राज्यापर्यंतचे सर्वच नेते विविध अभियानात गुंतलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय अशा आंदोलनांबाबत पक्षाचे कोणतेही धोरण नसताना, कोणताही आदेश नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याने केंद्र भाजपने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !

शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलेली आंदोलने कोणाच्या आदेशाने केली, असे प्रकार पुण्यात वारंवार का घडत आहेत, अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे याची जाणीव आहे का? या घटनांच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांची जाणीव आहे का अशा शब्दांमध्ये जाब विचारतच केंद्रीय नेत्यांनी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकूणच पुण्यातील हा राडा शहर भाजपसह प्रदेशस्तरावरील नेत्यांना देखील महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube