अजितदादांकडे जबाबदारी; पुणे सोडण्यापूर्वी चंद्रकांतदादांनी घाईघाईत घेतली ‘डीपीसी’ची बैठक
पुणे : मावळते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (5 ऑक्टोबर) चार्ज सोडण्यापूर्वी पुण्याची धावती आढावा बैठक घेतली. या बैठकीचे नेमके इतिवृत्त अद्याप समजू शकले नसले तरी यावेळी पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भाजप, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मंजूर कामांबाबत विचारणा केल्याची चर्चा आहे. या कामांचे इतिवृत्त तयार होऊनही त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. परिणामी ही कामे अडकून पडली आहेत. (Chandrakant Patil held a quick review meeting in Pune before leaving the post of guardian minister)
Pune News : ड्रग्स तस्करीतला आरोपी पळून जाणं पोलिसांना भोवलं; निलंबनाची कारवाई…
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी 800 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. मात्र, पाटील यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे आल्यावर या मंजूर कामांना कात्री लावली आणि जिल्ह्यातील भाजपबहुल भागाला 400 कोटींचा निधी दिला. पण या विकासकामांना मंजुरी दिलेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच करू नये, यासाठी दबाब आणण्यात येत असल्याने 400 कोटी सहीविना अडकून पडले होते.
दरम्यान, आता पालकमंत्रिपद पवार यांच्याकडे आल्याने 400 कोटी रुपयांची अडकलेली कामे मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय पवार गटाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना डीपीसीमधून अतिरिक्त निधीही मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार – चंद्रकांत पाटील वादात अडकली 400 कोटींची कामे :
पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित पवार हे पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्न याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
Pune News: धक्कादायक! पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून अत्याचार
मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत होते. पालकमंत्रिपद जरी आपल्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले होते. पवार यांच्या या बैठकांमुळे चंद्रकांतदादांसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली होती. पुण्यातील कामांसंदर्भात चंद्रकांत पाटीलही अधिकाऱ्यांना सूचना करत असत. मात्र दोन मंत्र्यांपैकी नेमके ऐकायचे तरी कोणाचे? अजितदादांचे ऐकायचे की चंद्रकांतदादांचे? अशा घोळात ही कामे अडकून पडली होती.