सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस नेत्यांना फोन; भुजबळांनी बारामतीतील सभेत सर्व सांगितलं
Chhagan Bhujbal- मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कसा प्रयत्न केला, याची माहिती दिली.
Chhagan Bhujbal On Baramati By Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामतीमध्ये महायुतीची सभा झाली. या सभेचा महायुतीचे नेतेही उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कसा प्रयत्न केला, याची माहिती दिली. काँग्रेसच्या नेत्यांना स्वत: सुनेत्रा पवार यांनी संपर्क केला होता.
बारामतीच्या सभेत छगन भुजबळ म्हणाले, अनेक निवडणुका लढलेले आहेत, जिंकलेले आहात. या निवडणुकीची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. आजही मंत्रालयात गेलं की असं वाटतं कुठून तरी अजितदादा येतील. बारामतीमध्ये आज उतरल्यानंतर दादा नाही, अशी बारामती मनाला फार अजूनही चटका लावते. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टी दैवाच्या हातात असतात. पण जे आहे ते आहे. खरं म्हणजे निवडणूक घेण्याचा प्रश्न नव्हता. दादांना अचानक जाण्याची वेळ निवडली आहे, त्यामुळे ही निवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार केवळ बारामतीचे उमेदवार नाहीत. त्या राज्याच्या नेत्या आहेत. त्यादृष्टीने पुढची वाट असली पाहिजे आहे.
अनेक पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. मी आणि दिलीप वळसे पाटील आम्ही बसलो होतो. सुनेत्राताईंनी एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. त्यांनी पाठिंबा दिला. महादेव जानकर, रामदास आठवले यांना फोन लावला होता. उद्धव ठाकरे यांनी फोनवरून आम्हाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) अगोदर जाहीर करून टाकलं आम्ही उमेदवार देणार नाही म्हणून.
दिलीप वळसे पाटील आणि मी पवारसाहेबांना भेटले. सुप्रिया सुळेही या ठिकाणी होत्या. त्यांचे पण आशीर्वाद आहे. सुनेत्रा ताईंनी काँग्रेसचे अध्यक्षा मलिकार्जुन खरगे यांना फोन लावायचा प्रयत्न केला. तो कुठे विमानात होतो. मला कळलं जयराम रमेश त्यांचे नेते आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले, आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ, असे भुजबळ सभेत म्हणाले. कोणाची विरोधात वाईट बोलण्याचे काहीच कारण नाही. अजूनही आम्ही सर्वांना विनंती करणार आहे. या निवडणुकीची पाश्वभूमी पाहा आणि ती लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी बिनविरोध निवडणूक पार पाडली पाहिजे. माझी खात्री आहे, राजकारणी शेवटी माणसं आहेत. त्यांना भावना आहेत, मी सांगतो आहे, कुणाच्या विरोधात बोलण्याचे कारण नाही. विरोधात बॅनर लावू नका, पोस्टर लावू नका, प्रतिआव्हान देण्याची गरज नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.