श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या 135 व्या उत्सवाची सुरुवात, ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर वासा पूजन
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून दरवर्षी वेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला जातो.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती (Pune) अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या १३५ व्या गणेशोत्सवाची रविवारी ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर दिमाखात सुरुवात झाली. उत्सव मंडपाचे पारंपरिक पद्धतीने वासा पूजन करण्यात आले. यावेळी यंदाच्या गणेशोत्सवासाठी साकारण्यात येणाऱ्या ‘श्री गणेश सुवर्णधाम’ या काल्पनिक देखाव्याचेही अनावरण करण्यात आले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१ क्रुषिकेश रावले, अशोक इलेक्ट्रिकलचे अशोकभाई शहा आणि उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते मंडपाचे विधिवत वासा पूजन करण्यात आले. त्यानंतर यंदाच्या देखाव्याचे अनावरण करण्यात आले.
यंदाचा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ हा देखावा पार्वतीनंदन शिवपुत्र श्री गणेश आणि भारतीय संस्कृतीतील ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या विचारावर आधारित आहे. आई-वडिलांप्रती कृतज्ञता, त्यांचे महत्त्व तसेच भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजनाची परंपरा या देखाव्यातून अधोरेखित करण्यात येणार आहे. गणेशभक्तांना धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारा हा देखावा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून दरवर्षी वेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला जातो. यंदाही भक्तांना आगळावेगळा आणि संस्कृती-परंपरेचा संदेश देणारा देखावा पाहायला मिळणार आहे. १३५ व्या गणेशोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन म्हणाले, “क्रांतिकारकांचा गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या सजावटीचे वासा पूजन आणि देखावा अनावरण क्रांतीदिनी झाले. यावर्षी ‘श्री गणेश सुवर्णधाम’ हा काल्पनिक देखावा उभारला जाणार आहे. धार्मिक पावित्र्य आणि परंपरा जोपासत यंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही डिजेमुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी केली जाणार आहे.”
पोलिस उपायुक्त क्रुषिकेश रावले म्हणाले, “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनाचा मान मला मिळाला, याचा अत्यंत आनंद आहे. गतवर्षीही या मंडळाचा उत्सव पाहिला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विसर्जन मिरवणुकीतील शिस्त पाहिल्यानंतर पुण्याचा गणेशोत्सव आगळावेगळा का आहे, हे जाणवले. वासा पूजनाचा बहुमान दिल्याबद्दल ट्रस्टचा मनापासून आभारी आहे.”
वासा पूजन आणि देखावा अनावरण सोहळ्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर आणि **‘गणपती बाप्पा मोरया’**च्या जयघोषाने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.