ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेत सुवर्णयश; भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीत प्रथम क्रमांक
Dhruv Global School : भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम ज्युनियर गटात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सिद्धिका जैन हिने प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे: पुण्यातील नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावरील विविध शास्त्रीय नृत्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णयश संपादन केले आहे. भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीत या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.(Dhruv Global School Students Achieve Gold at National Classical Dance Competition; Secure First Place in Bharatanatyam and Odissi)
मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम ज्युनियर गटात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सिद्धिका जैन हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर सहाव्या ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट 2026 मधील सोलो भरतनाट्यम ज्युनियर गटात अहाना गुप्ता हिने बाजी मारत प्रथम स्थान मिळवले.
ओडिसी नृत्यशैलीतही विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी नोंदवली. अखिल भारतीय राष्ट्रीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेत मिशिका चतुर्वेदी हिने प्रथम पुरस्कारासह ‘बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड’वर आपले नाव कोरले. याच बरोबर, सहाव्या ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट अँड फेस्टिव्हल 2026 च्या ओडिसी ज्युनियर गटात शारीनी काळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, समर्पण आणि नृत्य शिक्षक अवधूत चव्हाण व सुभश्री राउतराय यांचे मार्गदर्शन लाभले. या चमकदार कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांचे ध्रुव ग्लोबल स्कूल परिवाराकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.