फ्रॅंचायझी देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची 30 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिध्द सांबार हॉटेलची (Sambar Hotel) फ्रॅंचायझी (Franchise) देण्याचं आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची 30 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडीस आली. याप्रकरणी भारती पोलिस ठाण्यात (Bharti Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून हॉटेल मालकासह त्यांच्या मुलावर आणि मुलीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of around 30 lakhs by pretending to give franchise of a famous hotel)
याबाबत अधिक माहिती अशी की, सांबार हे पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल असून त्याच्या अनेक ठिकाणी फ्रॅंचायझीज आहेत. फिर्यादी संजय शामराव येवले (वय 55, रा. मोरेबाग, कात्रज) हे सातारा रोडवरील सांबार हॉटेलमध्ये फ्रॅंचायझीची चौकशी करण्यासाठी 2019 मध्ये गेले होते. त्यावेळी रामाजयम कुट्टी (वय 62, रा. पौंड रोड, पुणे) यांनी फ्रॅंचायझी देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी येवले यांचा विश्वास संपादन करत बाजीराव रोड येथे त्याच हॉटेलचे नवीन काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच या हॉटेलच्या फ्रँचायइजी देण्यासाठी 15 लाख रुपये, हॉटेलसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी 10 लाख रुपये आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 5 लाख रुपये असे एकूण 30 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितलं.
उद्धव ठाकरे गटाचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच मोठा आरोप; अधिवेशन पुन्हा तापणार?
त्यानुसार येवले यांनी रामाजयम कुट्टी याला एकूण 30 लाख रुपये दिले. त्यांनंतरही 2 ते 3 महिने उलटून गेले तरी त्यांना हॉटेलची फ्रॅंचायझी मिळाली नाही. तसेच पैसे परत मागितल्यानंतर कुट्टी यांनी येवलेंना धनादेश दिले. मात्र, ते धनादेश बँकेत जमा केले असता बँक खाते बंद असल्याचं समजलं.
या सर्व प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रामाजयम गोविंद राज कुट्टी, स्वप्नील रामाजयम आय्या कुट्टी, अनुप्रियता रामाजयम आय्या कुट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक नितीन जाधव अधिक तपास करत आहेत