श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद; 10 हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ
या आरोग्य शिबिरामध्ये वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान (Ashadi) करून पुण्यनगरीत विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण मसाज सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या सेवा उपक्रमाला वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून. महाप्रसाद सेवेचा तर जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो भाविक पुणे शहरात मुक्कामी आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जातात.
आषाढी वारीपूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी मानाच्या अश्वांची भक्तिमय वंदना
यंदाच्या आषाढी वारीतही “सेवा हीच साधना” या भावनेतून वारकरी भाविकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास, पायी वारी आणि शारीरिक थकवा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी व औषध वाटपाची सुविधा करण्यात आली होती.
या आरोग्य शिबिरामध्ये वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चरण मसाज सेवाही आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. वारकरी भाविकांनी या सेवांचे कौतुक करत ट्रस्टच्या उपक्रमाचे स्वागत केले.