14 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठा दिवस, दुपारी 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल

सकाळी 11 वाजता पुणे येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन निकालासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.

Untitled Design 65

Hsc results to be announced today : मागील दोन ते अडीच महिन्यांपासून दहावी-बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. आज,2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता पुणे येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन निकालासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.

या पत्रकार परिषदेत एकूण निकालाचा टक्का, विभागनिहाय कामगिरी, मुला-मुलींचा निकाल, विषयानुसार निकाल, तसेच यंदाच्या परीक्षेतील विशेष बाबी याबाबत माहिती दिली जाईल. यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असल्यामुळे निकालाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव वापरून निकाल तपासता येईल. निकालात प्रत्येक विषयाचे गुण, एकूण टक्केवारी आणि निकालाची स्थिती (पास/फेल) स्पष्टपणे दर्शवली जाईल. याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांची तात्पुरती गुणपत्रिका डाउनलोड करून प्रिंटही घेता येईल, जी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

भुवनेश्वर कुमारसमोर जोस बटलर पुन्हा फेल! टी-20 मध्ये नऊवेळा केली शिकार

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:

mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
results.digilocker.gov.in

निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळ संकेतस्थळांवर ताण वाढण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम राखून वेळोवेळी प्रयत्न करावा, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबद्दल शंका आहे किंवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असल्याचे वाटत असेल, त्यांच्यासाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 मे 2026 पासून 17 मे 2026 पर्यंत या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेणे अनिवार्य आहे. फोटोकॉपी मिळाल्यानंतर 5 दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासाठी लागणारे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन भरता येईल. एकूणच, दीर्घ प्रतीक्षेनंतर येणारा हा निकाल विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, राज्यभरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

follow us