मी आयुष्यात अपयशी ठरलोय का?, महिना अखेरीस वडिलांकडून पैसे घेणाऱ्या तरुणाची पोस्ट व्हायरल
Reddit Viral Post आजही महिन्याच्या शेवटी मला पप्पांकडून 5 हजार रुपये घ्यावे लागतात. ते कधीच नकार देत नाहीत. माझी गरज त्यांना समजते. पण...
Software Engineer Reddit Viral Post : हातात अभियांत्रिकीची पदवी, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी आणि दरमहा 24 हजार रुपयांचा पगार… वरकरणी पाहता सगळं सुरळीत वाटतं. पण या पगारात महिन्याचा खर्च भागत नसल्याने आजही वडिलांकडून 5 हजार रुपये मागावे लागतात आणि त्याचीच सर्वाधिक खंत वाटते, अशी व्यथा एका 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर मांडली आहे. ‘मी आयुष्यात अपयशी ठरलोय का?’ असा त्याने विचारलेला प्रश्न सध्या हजारो तरुणांच्या मनातील भावना व्यक्त करत असल्याने ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
लाईक्स, कमेंट्स अन् व्ह्यूजवर ठरतो Gen Z चा हॅप्पीनेस?, नव्या संशोधनातून मोठा खुलासा
रेडिटवरील r/IndianWorkspace या फोरमवर ध्रुव (यूजरनेम – dhruvermafz) या तरुणाने आपला संघर्ष उलगडून सांगितला आहे. टियर-3 कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या ध्रुवला JEE परीक्षेत यश मिळालं नाही. मात्र, त्याने हार न मानता प्रोग्रामिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कॉलेजच्या प्लेसमेंटमध्ये मोजक्याच कंपन्या आल्याने त्याला नोकरी मिळणं कठीण झालं. अनेक प्रयत्नांनंतर एका स्टार्टअपमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली आणि करिअरला दिशा मिळाल्याचं वाटू लागलं. मात्र, काही महिन्यांतच स्टार्टअपला आर्थिक फटका बसला. फंडिंग थांबल्याने कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आणि इंटर्न असल्यामुळे ध्रुवलाही कंपनी सोडावी लागली.
मोठ्या कंपन्यांचे इंटरव्ह्यू… पण प्रत्येकवेळी निराशाच
दोन महिन्यांच्या संघर्षानंतर त्याला एका SaaS कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, पगार ठरला अवघा 24 हजार रुपये. कामाचं वातावरणही अपेक्षेप्रमाणे नसल्याचं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं आहे. परिस्थिती बदलावी म्हणून त्याने Amazon, Meesho, McKinsey आणि Accenture यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या. चार-पाच फेऱ्या पार केल्यानंतरही प्रत्येकवेळी नकारच मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास डळमळू लागला.
वडील नाही म्हणणार नाहीत… पण मला स्वतःचीच लाज वाटते
ध्रुवच्या पोस्टमधील सर्वाधिक भावनिक भाग म्हणजे त्याची आर्थिक अडचण. तो लिहितो, “आजही महिन्याच्या शेवटी मला पप्पांकडून 5 हजार रुपये घ्यावे लागतात. ते कधीच नकार देत नाहीत. माझी गरज त्यांना समजते. पण मी स्वतः कमवत असताना त्यांच्याकडे पैसे मागणं मला आतून खूप खटकतं. त्याचीच लाज वाटते.” ही एकच ओळ अनेक तरुणांच्या वास्तवाला शब्द देणारी ठरली.
खाजवा डोकं! महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराला Salary नाव कसं पडलं?
‘तू अपयशी नाहीस, परिस्थिती कठीण आहे’
ध्रुवची पोस्ट व्हायरल होताच हजारो नेटिझन्स त्याच्या पाठीशी उभे राहिले. अनेकांनी सध्याच्या जॉब मार्केटची परिस्थिती लक्षात घेता त्याला धीर दिला. एका यूजरने लिहिलं आहे की, “स्वतःला अपयशी समजू नकोस. आजची परिस्थिती कठीण आहे. काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हा संघर्षच तुझी ताकद ठरेल.” तर, दुसऱ्या एका यूजरने म्हटलंय की, “सध्याच्या बाजारात नोकरी असणं हीच मोठी गोष्ट आहे. कौशल्य वाढवत राहा, योग्य संधी नक्की मिळेल.”
ही तर आमची कहणी…
ध्रुवची ही पोस्ट केवळ एका तरुणाची कहाणी नाही. कमी पगार, नोकरीतील अस्थिरता, ले-ऑफ आणि वाढती स्पर्धा यामुळे संघर्ष करणाऱ्या हजारो तरुणांच्या मनातील भावना या पोस्टमधून व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर अनेकांनी “ही तर आमचीच कहाणी आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
डिस्क्लेमर : ही बातमी रेडिटवरील एका व्हायरल पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियांवर आधारित आहे. पोस्टमधील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.