पत्रकार हत्या विषय काढताच Narayan Rane चिडले; तेच तेच काय विचारताय?

पत्रकार हत्या विषय काढताच Narayan Rane चिडले; तेच तेच काय विचारताय?

पुणे : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे (Journalist Shashikant Warishe) यांचा एका अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर आरोप केला आहे. यावर प्रश्न विचारला असता राणे पत्रकारांवरच संतापले. म्हणाले, मी पत्रकार शशिकांत वारीशे यांना कधीही भेटलेलो नाही. यात माझा काही संबंध नाही असे राणे यावेळी म्हणाले.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. यावेळी मंत्री नारायण राणे यांना पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणावर विचारण्यात आले. दरम्यान तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणात राणे यांच्यावर संशय व्यक्त केला. यालाच प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, पत्रकार वारीशे याला मी कधीही भेटलो नाही, माझा काही संबंध नाही. तसेच सिंधुदुर्गात काही झाले तरी त्या विनायक राऊत यांच्या तोंडावर केवळ एकच नाव असते.

विनायक राऊत म्हणजे आमच्या सिंधुदुर्गला लागली कीड आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच राणे म्हणाले, विकासकामात व्यत्यय आणणे, अडथळे आणणे, आंदोलने करणे एवढंच ते करतात.

मी विनायक राऊत तसेच पत्रकार वारीशे या प्रकरणाला उत्तर द्यायला आलेलो नाही, असे बोलत राणे यांनी एकप्रकारे पत्रकार वारीशे प्रकरणावर अधिकचे भाष्य करणे टाळले. माझा वेळ सत्कारणी लागावा यासाठी मी या कार्यक्रमाला आलो आहे. तसेच हे प्रकरण का घडले? कसे घडले याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांच्या तपासानंतर हे प्रकरण उलगडले जाईल असे नारायण राणे म्हणाले आहे.

नेमकं प्रकरण काय ?
कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube