कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून, समाजसेवेचे प्रभावी माध्यम : न्यायाधीश एम. के. महाजन
Justice M. K. Mahajan: सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे.
पुणे : कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे. वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे. सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे. महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचे समाधान देणारी आहे. विशेषतः महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ती एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे, असे मत पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन (Justice M.K. Mahajan) यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि जाधवर लॉ कॉलेज (Jadhawar Group of Institutes and Jadhawar Law College) तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी 2025” या कार्यक्रमाचे आयोजन नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले होते. या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी अॅड. हर्षद निंबाळकर, सी. ए. जाधव, मोहन क्षीरसागर, आणि एम. एच. हिरानी, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर (Dr. Sudhakar Jadhav), उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. लीगल एड सेंटरचे उद्घाटन यावेळी झाले. (Law is not just a way of earning a living, but an effective medium of social service: Justice M. K. Mahajan)
एम. के. महाजन म्हणाले, सार्वजनिक अभियोक्ता यांचे कार्य हे न्यायक्षेत्रातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. न्यायालयात उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधा, साधनसामग्री आणि वेळेच्या बंधनांमध्ये राहून ते न्यायप्रक्रिया पार पाडतात. या सर्व अडचणींनंतरही ते पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, कोणत्याही वकीलाला सरकारी वकील व्हावे असे वाटत नाही. त्यामुळे सरकारी वकील बनविण्याचे पहिले सेंटर जाधवर लॉ कॉलेज मध्ये उभारण्यात आले आहे. ज्या लोकांकडे पैसे नाहीत त्या लोकांसाठी न्यायदेवता हे सरकारी वकील असतात. म्हणून चांगल्या दर्जाचे सरकारी वकील तयार झाले पाहिजेत.
प्रा. डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, आमचे विद्यार्थी ज्ञानी झाले पाहिजेत. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या देशाचा युवक समाजप्रेमी, राष्ट्रप्रेमी झाला पाहिजे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
