दादांचं राजकारण! वेळेचे कारण देत अजितदादांकडून चंद्रकांत पाटलांचा कार्यक्रम

दादांचं राजकारण! वेळेचे कारण देत अजितदादांकडून चंद्रकांत पाटलांचा कार्यक्रम

Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजितदादा (Ajit Pawar) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) या दोन्ही दादांमधील सुप्त वाद वाढतच चालला आहे. आता या वादाचा नवा अंक पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात पाहण्यास मिळाला. यावेळी दोन्ही दादांत चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहण्यास मिळालं. दोघांनीही एकमेकांवर मिश्किल कोट्या करत निशाणा साधला.

त्याचं झालं असं, पुणे जिल्हा परिषद गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दोघेही उपस्थित राहणार होते. प्रत्यक्षात मात्र चंद्रकांत पाटील येण्याआधीच अजित पवार यांनी कार्यक्रम सुरू केला. खरं तर या कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 वाजताची होती. कार्यक्रमाला उशीर होत असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांच्यासाठी न थांबता अजितदादांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. भाषणही केलं.

पुण्यातील दोन ‘दादांचा’ वाद शिगेला; नाराजी नाट्यात CM शिंदेंची एन्ट्री

वेळेला महत्व द्या, वेळेत यायला शिका

अजितदादा (Ajit Pawar) भाषणात म्हणाले, नीट राहा, फीट राहा. अलीकडे आम्ही बऱ्याचदा कुणाला तरी विचारतो काय रे काय झालं तुला? नाही दादा व्हायरल इंफेक्शन झालं. कशाचं व्हायरल इंफेक्शन. अलीकडे तर काही झालं तरी व्हायरल इंफेक्शन. त्यापेक्षा सवयी चांगल्या लावा. सकाळी लवकर उठायला शिका. वेळेला महत्व द्या. कार्यक्रमाला वेळेला जायला शिका. वेळेत कार्यक्रम संपवायला शिका. म्हणजे चांगल्या सवयी लागतात, अशा शब्दांत अजितदादा यांनी उपस्थितांसह सगळ्यांचीच शाळा घेतली. या भाषणातून त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांनाही टोले लगावल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

अजितदादांनी जे म्हटलं, तेच माझंही म्हणणं – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनीही भाषणात मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, अजितदादांनी संपूर्ण जिल्ह्याचा तालुकानिहाय गुणवत्तेचा आढावा घेतला आहे. आढाव्याच्या निमित्ताने दादांचा एक स्वभाव आहे की ओरखडा येऊ न देता चिमटा काढायचा. तसा तुम्हा सगळ्यांना ओरखडा येऊ न देता चिमटा काढलाय. तुम्हाला पुढील काळात काय केलं पाहिजे याच्या सूचना दिलेल्या असल्याने मी एवढं वाक्य जरी म्हटलं की दादांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं त्याला संस्कृतमध्ये ‘मम’ म्हणतात. दादांच्या भाषणाला ‘मम’ म्हटलं की माझं भाषण संपेल.

दादा विरुद्ध दादा! अजित पवार-चंद्रकांत पाटील वादात अडकली पुण्यातील 400 कोटींची कामे

दादा विरुद्ध दादा वाद का वाढला ?

शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यात बैठकांचा धडाका सुरु केला आहे. अजित पवारांच्या या धडाक्यामुळे पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्रिपद जरी आपल्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पवार यांच्या या बैठकांमुळे चंद्रकांतदादांसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच कोंडी झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube