पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार

पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार

Pune News: अजित पवार समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. आमदारांचे मंत्रीही झाले. मात्र स्वातंत्र्यदिनाचा सोहळा तोंडावर आलेला असताना अजूनही कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळालेलं नाही. पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार दावा करत असल्याच्या चर्चा वारंवार सुरू असताना चंद्रकांतदादा देखील पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र, आता 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या निमित्ताने पालकमंत्रीपदाचा वाद मिटला की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हेच ध्वजारोहण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर दुसरीकडे चंद्रकांतदादा ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून येतात त्या कोल्हापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या पुण्यात चंद्रकांतदादा आणि चंद्रकांतदादांच्या कोल्हापुरात अजितदादा, असे चित्र पाहण्यास मिळणार आहे. अजित पवारांबरोबरच राज्याच्या इतर जिल्ह्यांत देखील राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांना भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असणाऱ्या अतिरिक्त जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री कुठे करणार ध्वजारोहण ?

दिलीप वळसे पाटील-वाशिम, हसन मुश्रीफ-सोलापूर, धनंजय मुंडे-बीड, छगन भुजबळ-अमरावती, अनिल पाटील-बुलढाणा, अदिती तटकरे-पालघर, धर्मराव आत्राम-गडचिरोली, संजय बनसोडे-लातूर अशी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपाच्या मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी होती ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मंत्र्यांकडे पालकमंत्री म्हणून देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

चंद्रकांतदादांचे पुणेकरांना आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा ९ ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे महापालिकेकडून पालकमंत्री पाटील यांना आज राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात राष्ट्रध्वज वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्र म्हणून एकत्रितपणे घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे हे राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube