पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये उभा राहणार PM मोदींचा पुतळा; स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा असणार उंच
PM Modi Statue in Lavasa : राज्यातील लवासा सिटीत पीएम मोदींचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या वर्षातील डिसेंबर महिन्यात या प्रतिमेचे अनावरण करण्याचेही नियोजन केले जात आहे. याआधी गुजरात येथील व्यापाऱ्याने जानेवारी महिन्यात 156 ग्रॅम वजनाचा पंतप्रधान मोदींचा सोन्याचा पुतळा बनवला होती. त्यानंतर आता लवासातही असाच भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू आहे. हा पुतळा साधारण 190 ते 200 मीटर उंच असून हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल असा दावा केला जात आहे.
Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप
पु्ण्याजवळच लवासा (ता. मुळशी) स्थित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून हा पुतळा तयार करण्यात येत आहे. 31 डिसेंबर आधीच या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमात इस्त्राएल, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, सऊदी अरब आणि अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी सहभागी होतील.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनकडून डीपीजीएल कंपनीला योजनेसाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर हा पुतळा प्रत्यक्षात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. कंपनीचे अध्यक्ष अजय सिंह म्हणाले, की ज्या ठिकाणी मोदींचा पुतळा बसविण्यात येणार आहे तेथे भारताचा वारसा दर्शवण्यासाठी एक संग्रहालय, एक स्मारक उद्यान, मनोरंजन केंद्र आणि एक प्रदर्शन हॉल असेल. प्रदर्शन हॉलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे जीवन आणि कर्तुत्वावर आधारीत झलक पाहायला मिळणार आहे.
देशाची एकता आणि अखंडतेसाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. देशातील लोकही त्यांच्याकडे उमेदीने पाहत आहेत. हा पुतळा त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी समर्पित आहे, असे सिंह म्हणाले.
सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षाही जास्त उंच
गुजरात येथे देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखला जातो. हा पुतळा जवळपास 182 मीटर इतका उंच आहे. परंतु, पुण्यातील लवासा येथे उभारण्यात येणारा पंतप्रधान मोदी यांचा पुतळा हा 190 ते 200 मीटर इतका उंच असेल असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच हा मोदींचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षाही जास्त उंच असेल असे दिसते.