Download App

मोठी बातमी! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं आहे. पुणे शहरातील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्षे होते. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ या गाण्यांमधून पळसखेडची लोकगीते प्रसिद्ध केली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. महानोर यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. दवाखान्यातील आयसीयू विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर महानोर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. साहित्य अकादमी ते पद्मश्री पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. निसर्गकवी ही त्यांची विशेष ओळख होती. ते शेतकरी होते. त्यामुळे सगळाच निसर्गच त्यांच्यात सामावला होता. त्यांच्या लिखाणातूनही याचा वेळोवेळी प्रत्यय येत होताच.

संभाजी भिडेंना वक्तव्य भोवलं! आठ दिवसांत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश…

महानोर यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गाणी लिहीली, तशा ठसकेबाज लावण्याही लिहील्या. ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही त्यांनी लिहीलेली लावणी लोकप्रिय झाली. गायिका आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे. महानोरांच्या कवितांनी ‘रानातल्या कविता’ पावसाळी कवितांनी ‘जैत रे जैत’ सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवले.

महानोर म्हणजे हाडाचा शेतकरी

शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा शेतकवी.  सोयगाव तालुक्यातील पळसखेडसारख्या गावात 16 सप्टेंबर 1942 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 7 ते 8 वर्षात शाळेत असतानाच त्यांना छंद जडला. रानावनाच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कवितांवर याचा चांगलाच प्रभाव जाणवतो. ते स्वतःला हाडाचा शेतकरी मानत होते. आपला व्यवसाय सांगतानाही ते शेती हाच सांगत असत. त्यांचा साहित्य विषय देखील शेती हाच होता.

त्यांच्या लेखणीतून ‘अजिंठा’, ‘कापूस खोडवा’, ‘पानझड’, ‘पावसाळी कविता’, ‘पळसखेडची गाणी’, ‘पक्षांचे लक्ष थवे’, ‘रानातल्या कविता’, ‘शेती’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘त्या आठवणींचा झोका’, ‘दिवेलागणीची वेळ’ असे दर्जेदार साहित्य साकारले. ‘शेतीसाठी पाणी’, ‘जलसंधारण’, ‘फलोत्पादन’, ‘ठिबक सिंचन’, ‘शेतकरी दिंडी’ ही पुस्तकेही त्यांनी शेतकऱ्यांसाठी लिहीली. वेळ आणि कमी खर्चात शेती कशी करता येईल याबाबत महानोर यांनी या पुस्तकात लिहीले आहे.

आज मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा, ऑरेंज अलर्ट जारी

आमदारकीच्या काळात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज

महानोर विधानपरिषदेचे माजी आमदार होते. विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीच्या आणि अभ्यासाचा विषय असलेल्या शेतीवर प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कमी पाण्यावर पिके घेता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. राज्य सरकारने त्यांच्या या प्रयोगाची दखल घेत कोरडवाहू फळझाड योजना सुरू केली.

..अन् पाणी अडवा-पाणी जिरवा आले सत्यात

महानोर यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात जलसंधारणावर विशेष अभ्यास केला. पाणी अडवून ते जमिनीत जिरवल्याने विहीरीतील पाणी वाढते. यावर त्यांनी प्रयोग केला. त्यातूनच पुढे पाणी अडवा-पाणी जिरवा ही योजना समोर आली. नाला बेड कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले.

 

Tags

follow us