Pune Nashik Highway भीषण अपघात; महिलांच्या घोळक्याला कारने उडवलं, 5 जणींचा मृत्यू
पुणे : पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, ता. खेड परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी रात्री ११: ४५ वाजण्याचा सुमारास भीषण अपघात झाला. (pune nashik highway) या भीषण अपघातात पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या अज्ञात (महिंद्रा एक्स युव्ही ) कारने १७ महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. (van crushed) यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून अक्षरशः चिरडल्या. त्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. तीन रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाली.
सुनंदा सटवा गजेशी, सुशिला वामन देढे (रा.रामटेकडी शांतीनगर ), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा.किरकटवाडी सिंहगडरोड पुणे ), सायराबाई प्रभु वाघमारे (रामटेकडी हडपसर पुणे ), या महिला अपघातात मुत्यूमूखी पडल्या आहेत. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली लक्ष्मण धोत्रे, शोभा सुभाष शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातातील मयत व जखमी हे अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात वाढपी म्हणून काम करण्यासाठी स्वारगेट येथून पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या होत्या. खरपुडी येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी जात असताना घोळक्याने रस्ता क्रॉस करताना पुणे बाजुकडुन एक पांढरे रंगाची महींद्रा एक्सयुव्ही या माँडेलची कार भरधाव वेगात आली. आणि त्यांना जोरात धडक दिली.
हा अपघात रात्री झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडाओरडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत शिवानी कैलास माने ( रा.पर्वती दर्शन साईबाबा मंदीरासमोर, सातारा रोड, स्वारगेट) यांनी अज्ञात चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.