“दोन्ही दादांच्यामध्ये आमचे मरण…” : गोऱ्हेंनी विषय छेडताच अजितदादांनी मार्गी लावली शिवसेनेची कामे
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मागील काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात वादाची ठिणगी पडली होती. अजित पवार गटाच्या आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) सदस्यांनी यापूर्वीच आक्षेप घेतले होते. अखेर काल (10 जानेवारी) या वादावर पडला असून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपच्या प्रस्तावित कामांना मान्यता दिली आहे. याशिवाय शिवसेना सदस्यांनी त्यांची कामे सादर करावीत, असे निर्देशही दिले आहेत.
आज (10 जानेवारी) तब्बल नऊ महिन्यांनंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये ऑनलाईन पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2024-25 च्या 948 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 135 कोटी आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 45 कोटी 84 लाख रुपये अशा एकूण एक हजार 128 कोटी 84 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
भाजपच्या कामांना मंजुरी :
अजित पवार गटाच्या आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरून बैठकीत भाजप आणि शिवसेनेचे सदस्य आक्रमक भूमिका घेण्याच्या पावित्र्यात होते. मात्र त्यापूर्वीच चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली मात्र अडविण्यात आलेल्या कामांना मंजुरी देण्याबाबत तोंडी सहमती दर्शवली. पवार यांनी भाजपचे लोकप्रतिनिधी आणि सदस्यांच्या दिलेल्या कामांच्या याद्या मान्य केल्या.
शिवसेनेच्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश :
या बैठकीत नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या रखडलेल्या प्रस्तावित कामांचा आणि शिवसेनेला मिळणाऱ्या निधीचा मुद्दा छेडला. दोन्ही दादांच्यामध्ये (अजितदादा आणि चंद्रकांतदादा) आमचे मरण होत आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला मिळणाऱ्या निधीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती अजितदादांंना केली. त्यानंतर अजितदादांनीही या विनंतीची दखल घेत शिवसेना सदस्यांनी त्यांची कामे सादर करावीत, असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.