Nitin Gadakari : गडकरींनी सांगितला पुण्याच्या पीएमटीतील पहिल्या प्रवासाचा किस्सा
Nitin Gadakari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देहू व आळंदी येथील पालखी मार्गाची पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ते जेव्हा पहिल्यांदा देहू व आळंदीला गेले होते तेव्हाची आठवण सांगितली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांचे आस्थेचे स्थान हे देहू व आळंदी आहे, असेही ते म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केल्यानंतर माध्यमांना याविषयीची माहिती दिली. देहू व आळंदी हे आपल्या सगळ्यांसाठी आस्थेचे व श्रद्धेचे केंद्र आहे. मी आत्तापर्यंत अनेक रस्ते बांधले पण या रस्त्याविषयी वेगळं स्थान माझ्या मनात आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पुण्यात आलो होतो तेव्हा पीएमटीच्या बसने देहू व आळंदीला गेलो होतो. त्यासाठी स्वारगेटवरुन बस पकडली होती, अशी आठवण गडकरींनी आज सांगितली होती.
भारतात फक्त छत्रपती संभाजीराजांचाच उदो उदो होईल; फडणवीसांनी ठणकावले!
अनेक लोक हे दिल्लीहून पुण्याला खास पालखीमध्ये चालण्यासाठी येतात. अशा रस्त्याचे काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे गडकरी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्याविषयीची माहिती देखील दिली आहे. या मार्गावर एकुण 12 पालखी स्थळे असून त्या मार्गावर वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या दोन्ही पालखी मार्गाच्या रस्त्याच्या बाजूने वृक्षारोपन करण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
दरम्यान श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम केंद्रीय रस्ते खात्याकडून सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे भूमीपुजन झाले आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत पाहणी करताना माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर हे देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते.