पाच सर्व्हेतील ‘बॅकबेंचर्स’ ना भाजपाचा ‘STRICT NO’; पण, माजी नगरसेवकांचं दादांकडून ग्रँड ‘वेलकम’

Ajit Pawar NCP पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पाच व्यापक सर्व्हे राबवले.

  • Written By: Published:
पाच सर्व्हेत ‘बॅकबेंचर्स’ ना भाजपाचा 'STRICT NO'; पण, माजी नगरसेवकांचं दादांकडून ग्रँड 'वेलकम'

All Party Ex Corporator Join’s Ajit Pawar NCP In PCMC Area :  महानगरपालिका निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच भाजपनं उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. एवढेच काय तर, उत्तम उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी भाजपकडून पाच सर्व्हेदेखील करण्यात आले. यात अपयश ठरलेल्यांना पक्षाने तिकीटासाठी ‘स्ट्रिक्ट्ली नो’ म्हणून सांगितले आहे. मात्र, दुसरीकडे नाकारलेल्या याच उमेदवारांसाठी अजितदादांनी पक्षाची दारं खुली केली असून, पक्षात प्रवेश देत या सर्वांचं ग्रँड वेलकम केलं आहे.

अजित पवारांचा ‘एकला चलो’चा मोठा डाव; पुण्यात वेगळ लढण्याच्या निर्णयाने काय होणार?

भाजपच्या सर्व्हेचा उद्देश नेमका काय होता?

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (PCMC) पार्श्वभूमीवर भाजपाने अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पाच व्यापक सर्व्हे राबवले. या सर्व्हेचा उद्देश केवळ तिकीट वाटप नव्हता, तर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणारे, निवडून येण्याची क्षमता असलेले आणि प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम करणारे उमेदवार पुढे आणणे हाच होता. या सर्व्हेत अनेक माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर ‘फुली’ मारण्यात आली होती. त्यात आता भाजपा- राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याचे निश्चित केले आहे. त्यानंतर संबंधित इच्छुकांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून राष्ट्रवादीत प्रवेशाचा पर्याय निवडला आहे.

भाजपनं सर्व्हेत इच्छूकांचा घाम काढला

निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचा पहिला सर्व्हे आमदारांची कार्यप्रणाली व प्रभाव यावर आधारित होता. दुसरा सर्व्हे इच्छुक उमेदवारांची यादी आणि त्यांची तयारी तपासणारा होता. तिसऱ्या सर्व्हेमध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशीलता, जनसंपर्क, प्रभाव आणि पक्षासाठी त्यांनी आतापर्यंत काय योगदान दिले, याचा सखोल आढावा घेण्यात आला. चौथा सर्व्हे प्रभागनिहाय डाटा संकलन, स्थानिक राजकीय समीकरणे आणि संभाव्य लढतींचा अभ्यास करणारा होता. All Party Ex Corporator Join’s Ajit Pawar NCP In PCMC Area

तर, पाचवा आणि निर्णायक सर्व्हे थेट निवडून येण्याची क्षमता यावर केंद्रित होता. या पाचही सर्व्हेमध्ये ज्यांना आपली प्रगती, प्रभाव किंवा विजयी होण्याची क्षमता दाखवता आली नाही, अशा व्यक्तींना भाजपाच्या पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्वाने स्पष्टपणे बाजूला ठेवले. हा निर्णय कोणत्याही दबावाशिवाय, केवळ वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि राजकीय वास्तव लक्षात घेऊन घेण्यात आला.

Video : फडणवीसांचा राष्ट्रवादीशी ‘ब्रेकअप’; धक्का बसलेल्या दादांनी पलटवाराऐवजी बाजू सावरली

दादांनी पक्षात वेलकम केलेल्यांमध्ये कोण-कोण?

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक इच्छुकांची बैठक झाली. त्याठिकाणी भाजपाकडून निवडून आलेल्या आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जाधववाडीमधील भाजपच्या माजी नगरसेवक अश्विनी जाधव, आकुर्डीतील शिवसेनेचे (शिंदे) माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या महिला संघटिका रुपाली आल्हाट, शिवसेनेचे उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या-ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीकडे तुल्यबळ किंवा प्रभावी उमेदवार नव्हते, त्या प्रभागांमध्ये भाजपातील माजी नगरसेवकांसाठी राष्ट्रवादीने दारे खुली केली. यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षाशी दीर्घकाळ प्रामाणिक राहून काम करणाऱ्या उमेदवारांच्या तिकीटांवर गदा आली असून, आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली जात असल्याची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप

भाजपामध्ये तिकीट म्हणजे कृपा नव्हे, तर कर्तृत्वाची पावती असते

भाजपामध्ये तिकीट म्हणजे कृपा नव्हे, तर कर्तृत्वाची पावती असते. पाच सर्व्हेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभाग, प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक कार्यकर्त्याचे काम मोजले आहे. जे पक्षाशी प्रामाणिक राहिले, ज्यांनी संघटन वाढवले आणि ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच भाजपाची संधी मिळेल. तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांमुळे भाजपाची दिशा बदलत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा विजय हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावरच निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा, पिंपरी-चिंचवडचे प्रवक्ते कुणाल लांडगे यांनी दिली आहे.

follow us