पुण्यात किळसवाणा प्रकार! समोस्यात भरले कंडोम अन् दगड; 5 जणांवर गुन्हा दाखल
Pimpari Chinchwad News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मोठ्या ऑटोमोबाईल फर्मला पुरवण्यात आलेल्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. ANI ने याविषयीचे वृत्त दिले. कंपनीने एका कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले होते. त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे. समोस्यात काहीतरी मिसळून ठेकेदाराला बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 जणांपैकी एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना कंपनीमध्ये सामोसे पुरवठा करण्यास सांगण्यात आले होते. तर भेसळीसाठी यापूर्वी काढण्यात आलेल्या अशा अन्य फर्मच्या तीन भागीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीमध्ये आता सामोसाचे कंत्राट असणाऱ्या फर्मची बदनामी करण्यासाठी या तीन भागीदारांनी दोन कामगारांना लावले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या ऑटोमोबाईलच्या फार्मच्या कॅन्टीनमध्ये कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड खाद्यपदार्थ पुरविण्याची जबाबदारी घेते.
कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी अॅटोमोबाईल फर्मच्या काही कर्मचाऱ्यांकडील समोस्यांमध्ये दगड, कंडोम, गुटखा सापडले.
पोलिसांनी या घटनेबाबत मनोहर एंटरप्रायजेसच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, फिरोज शेख आणि विकी शेख या दोन कामगारांनी समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘… तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी
आता या कामगारांनी असे कृत्य का केले, यामागे त्यांचा आणखी काय उद्देश होता याची माहिती पोलीस तपासातून बाहेर येईलच. पण, एकूणच या घटनेमुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे म्हणजे जीवाशी खेळ असेच म्हणावे लागेल.