“पक्षाने आम्हाला कोललं, तर आम्हीही पक्षाला कोलू!” ; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा इशारा…
Pradeep Garatkar : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
Pradeep Garatkar : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत वाद उफाळून आल्याने स्थानिक पातळीवर पक्षात दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा (Bharat Shah) यांना उमेदवारी देण्याच्या हालचालींना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर गारटकर यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच इशारा दिला आहे.
“पक्षाने आमच्यावर अन्याय केला, तर आम्हीही गप्प बसणार नाही. आमच्या मताचा सन्मान न झाल्यास स्वतंत्र आघाडी उभी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत.” असा इशारा गारटकरांनी (Indapur Municipal Council) पक्षनेतृत्वाला दिला आहे. बुधवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharne) यांच्या उपस्थितीत या वादावर महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर संध्याकाळी इंदापूर येथे गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, ज्यात गारटकर यांनी आपली ठाम भूमिका स्मांडली.
बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, “नेतृत्वाने आमच्या भावना समजून घेतल्या आणि सन्मान दिला, तर आम्ही अजित पवारांसोबत राहू. पण आमचं मत नाकारलं, तर राजीनामा देऊन स्वतंत्र उमेदवारी देण्यास आम्ही मागे हटणार नाही. शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू, मात्र अन्याय सहन करणार नाही.”
गारटकर पुढे म्हणाले, “आपण आपली ताकद दाखवली तर या शहरात एकतर्फी निवडणूक होऊ शकते. कार्यकर्त्यांचे मत ऐकून सन्मानाने एकत्र पॅनल उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, जर पक्षाने दुर्लक्ष केलं, तर आम्ही सुद्धा कोलल्याशिवाय राहणार नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 17 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. परंतु, पक्षाच्या विरोधात उभं राहावं लागलं तर मी आधी राजीनामा देईन ही माझी नैतिक भूमिका आहे.”
उपकार विसरणार नाही, तेवढं लग्न जमवून द्या; अविवाहित तरूणाचे पवारांना पत्र
दरम्यान, या घडामोडींमुळे इंदापूरमधील राजकारण तापले असून, जिल्हाध्यक्ष असलेल्या गारटकर गटाने दिलेला हा इशारा अजित पवार गटासाठी नवा डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. पुढील काही दिवसांत या वादाचा निकाल काय लागतो आणि त्याचा नगरपरिषदेच्या निवडणुकीवर कितपत परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
