उपकार विसरणार नाही, तेवढं लग्न जमवून द्या; अविवाहित तरूणाचे पवारांना पत्र
Sharad Pawar : राज्यातच नाही तर संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर
Sharad Pawar : राज्यातच नाही तर संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना अकोल्यातील एका तरुणांनं लग्नासाठी पत्र लिहिले आहे. मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही असं या पत्रात तरुणाने लिहिलं आहे. पत्र शरद पवार यांना मिळताच सगळ्या पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांनी तरुणाच्या लग्नासाठी कामाला लावलं आहे.
प्रकरण काय?
शरद पवार (Sharad Pawar) 8 नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या (Akola) दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी कान्हेरी सरपंच येथील शेतकरी संवाद साधला. या कार्यक्रमात एका तरुणाने शरद पवार यांच्याकडे लग्न होत नसल्याने पत्र देत मदतीचे आवाहन केले. सध्या या पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. वय वाढत आहे. आता लग्न झालं नाही तर भविष्यात माझं लग्न होणार नाही. मी एकटाच राहील. माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही असं साकडे शरद पवारांकडे या तरुणाने घातले आहे. यानंतर शरद पवार यांनी 9 नोव्हेंबर रोजी हे पत्र मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आमदार जयंत पाटील यांना दाखविले आणि या पत्रावर नेत्यांशी चर्चा देखील केली आणि या तरुणासाठी जे काही करता येईल ते करा अशा सूचना देखील शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
तरुण मुली शेतकरी नवरा नको अशी भूमिका घेत आहे : अनिल देशमुख
या पत्रावर बोलताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले की, शरद पवार सर्व समस्यांवर उपाय शोधू शकतात या अपेक्षनेच अकोल्यातील त्या तरुणाने शरद पवार यांच्याकडे लग्नाविषयी तक्रार केली असेल असं अनिल देशमुख म्हणाले. तसेच शरद पवार 8 नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या दौऱ्यावर असताना तो तरुण शरद पवार यांना भेटला होता आणि त्याने 34 वर्षाचा होऊन सुद्धा लग्न होत नाही, एकटेपणा जाणवतो अशी तक्रार त्या पत्रात मांडली होती. यानंतर मुंबईत पोहचल्यानंतर शरद पवार यांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दाखवत त्या तरुणाला मदत करावी असे निर्देश दिले असल्याची माहिती देखील अनिल देशमुख यांनी दिली.
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुणांचे लग्न होत नाही. तरुण मुली शेतकरी नवरा नको अशी भूमिका घेत असून ही एक सामाजिक समस्या झाली आहे आणि त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं देखील अनिल देशमुख म्हणाले.
दोन ते तीन दिवसात क्लिप टाकणार अन्…, साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराज घेणार मोठा निर्णय
पत्रात नेमकं काय लिहिलं आहे?
आदरणीय साहेब! माझे वय वाढत आहे. मी आता 34 वर्षांचा आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहील. तरी, माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालविण्याची हमी देतो. साहेब! मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.
