अखेर ठरलं! पुण्याच्या गाड्यांवर MH-12 की MH-61; केंद्रातून समोर आली मोठी अपडेट
Pune MH-12 Update पुणे आरटीओमध्ये सध्या 'MH 12 ZZ' ही विद्यमान प्रणालीतील शेवटची मालिका सुरू असून, यानंतर 'MH-61' हा नवीन कोड मिळणार?
MH-12 Or MH-61 Know About Pune New Series Update : पुणेकरांच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग बनलेला ‘MH-12’ हा वाहन नोंदणी कोड कायम राहण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. पुणे आरटीओमध्ये सध्या ‘MH 12 ZZ’ ही विद्यमान प्रणालीतील शेवटची मालिका सुरू असून, ती संपल्यानंतर पुण्याला ‘MH-61’ हा नवीन कोड मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, पुण्याची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत नवा पर्याय सुचवला आहे. या प्रस्तावाला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ‘MH-12’ कोड कायम राहण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
सरकारची LIC मधील हिस्सेविक्री, तुमच्या पॉलिसीवर परिणाम होणार का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
‘MH-61’ नव्हे, ‘MH-12’च राहणार?
पुण्यात वाहनांची संख्या विक्रमी वेगाने वाढत असल्याने ‘MH 12 ZZ’ ही शेवटची मालिका संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुढे कोणती नोंदणी पद्धत वापरायची, यावर परिवहन विभागात चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर पुण्याला ‘MH-61’ हा नवीन कोड मिळू शकतो, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ‘MH-12’ हा केवळ आरटीओ कोड नाही तर, तो पुण्याची ओळख, संस्कृती आणि पुणेकरांच्या भावनांशी जोडलेला एक ब्रँड आहे. त्यामुळे हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
देशात पहिल्यांदाच ‘MH 12 1A’ मालिकेचा प्रस्ताव
पुणेकरांची MH-12 प्रति असलेली भावना लक्षात घेऊन मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत ‘MH-12’ कोड कायम ठेवत त्याच अंतर्गत ‘MH 12 1A’, ‘MH 12 1B’, ‘MH 12 1C’ अशा स्वरूपातील नव्या नोंदणी मालिकांचा प्रस्ताव मांडण्यात आला. विशेष म्हणजे, ‘एक अंक + एक इंग्रजी अक्षर’ या स्वरूपातील नोंदणी मालिका देशात प्रथमच लागू करण्याचा हा प्रस्ताव आहे. या नव्या पद्धतीमुळे ‘MH-12’ ही पुण्याची ओळख कायम राहील आणि नवीन वाहन नोंदणीसाठीही पुरेशी क्षमता उपलब्ध होईल. या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेत ‘MH-12’ कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे.
‘MH-12’ का खास आहे?
पुणे म्हटलं की शनिवारवाडा, विद्येचं माहेरघर, मिसळ… आणि ‘MH-12’. महाराष्ट्रात कुठेही हा नंबर दिसला की ती गाडी पुण्याची असल्याचं सहज ओळखलं जातं. अनेक पुणेकरांनी आपल्या आवडीचे क्रमांक मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत. अनेकांच्या पहिल्या दुचाकीपासून, पहिल्या कारपर्यंत आणि व्यवसायातील पहिल्या वाहनापर्यंत ‘MH-12’ हीच ओळख कायम राहिली आहे. म्हणूनच हा बदल केवळ तांत्रिक नाही, तर भावनिक विषयही बनला होता.
अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
सध्या ‘MH 12 ZZ’ ही शेवटची मालिका सुरू असून, ती संपल्यानंतर नव्या मालिकेचा अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि परिवहन विभागाकडून घेतला जाणार आहे. मात्र, मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारामुळे ‘MH-12’ ही पुण्याची ओळख कायम राहण्याच्या आशा अधिक दृढ झाल्या आहेत.