पुण्यातील उन्नत मार्गांसाठी मलेशियन तंत्रज्ञान; गडकरींनी सांगितलं पैसे कसे वाचणार…
What Is Malesiyan UHPFRC Technology एका सिंगल पिलरवर अशा प्रकारचा प्रकल्प मी आणि फडणवीसांनी नागपूरमध्ये केला होता.
What Is Malesiyan UHPFRC Technology : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या तीन उन्नत मार्गांच्या भूमिभूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मलेशियाचे अत्याधुनिक ‘Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC)’ तंत्रज्ञानाचा उल्लेख केला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर पुण्यात बांधण्यात येणाऱ्या उन्नत महामार्गांमध्येही केला जाण्याची शक्यता आहे. नेमकं हे तंत्रज्ञान काय त्याचे फायदे काय त्याबद्दल जाणून घेऊया…
नेमकं काय म्हणाले गडकरी?
भूमिपूज कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, एका सिंगल पिलरवर अशा प्रकारचा प्रकल्प मी आणि फडणवीसांनी नागपूरमध्ये केला होता. तो आशियातील पहिला प्रकल्प होता. पण हा रेकॉर्ड तोडून पुढे जाणार आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींसाठी रेकॉर्ड तुटणार असतील तर काही वाईट नाही. या प्रकल्पामध्ये दिक्षीत साहेब आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की, मधल्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प करण्यामध्ये भारतीय IRC कोडप्रमाणे दोन मेट्रोमध्ये किंवा पुलामध्ये जे दोन पिलर उभे करतो त्याचे अंतर जास्तीत जास्त 30 मीटर राहतं. पण मधल्या काळात आपण मध्यंतीर मलेशियाने एक टेक्नोलॉजी विकस्ति केली.
अल्ट्रा हाय परफॉरमन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट याला UHPFRC म्हणतात. जी आपण स्वीकारली त्यामुळे आता दोन पिलरमधील अंतर हे 120 मीटर होऊ शकते. यामुळे तीन पिलरचा कमी झाल्याने खर्चही कमी होणार आहे. या टेक्नोलॉजीचा उपयोग आपण नागपूरलाही केला आहे. ज्यात 40 ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले. यामध्ये वरील बाजूस जो बिम आहे तो स्टील ऐवजी स्टील फायबरमध्ये कास्टिंग होतं त्यामुळे त्याची गुणवत्ता उत्तम आहे.
UHPFRC म्हणजे नेमके काय?
भारतात अद्याप मर्यादित प्रमाणात वापरले गेलेले हे तंत्रज्ञान जगभरातील आधुनिक पूल, उन्नत मार्ग, मेट्रो आणि महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे पुण्यातील प्रकल्पांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) हा पारंपरिक काँक्रिटचा अत्याधुनिक आणि अधिक मजबूत प्रकार आहे. सामान्य काँक्रिटमध्ये सिमेंट, वाळू, खडी आणि स्टीलचा वापर केला जातो. मात्र UHPFRC मध्ये यासोबत अतिसूक्ष्म स्टील फायबर्स (Steel Fibres), सिलिका फ्यूम, उच्च दर्जाचे सिमेंट, विशेष रासायनिक मिश्रणे (Superplasticizers) आणि इतर सूक्ष्म घटकांचा वापर केला जातो. या विशेष मिश्रणामुळे काँक्रिटची ताकद, लवचिकता आणि टिकाऊपणा अनेक पटींनी वाढतो. सूक्ष्म स्टील फायबर्समुळे काँक्रिटमध्ये तडे जाण्याची शक्यता अत्यंत कमी होते आणि त्याची भार सहन करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते.
सामान्य काँक्रिटपेक्षा किती वेगळे?
साधारण काँक्रिटची दाब सहन करण्याची क्षमता (Compressive Strength) सुमारे 30 ते 50 MPa असते. तर UHPFRC ची ताकद 150 ते 200 MPa किंवा त्याहून अधिक असू शकते. म्हणजेच हे काँक्रिट सामान्य काँक्रिटपेक्षा अनेक पटींनी मजबूत असते. याशिवाय तडे पडण्याची शक्यता अत्यंत कमी, गंज आणि पाण्याचा कमी परिणाम, भूकंप, कंपन आणि जड वाहतुकीचा अधिक चांगला सामना, कमी जाडीच्या स्लॅबमध्येही अधिक ताकद असते.
पुण्यातील उन्नत मार्गांसाठी हे तंत्रज्ञान का महत्त्वाचे?
पुण्यातील उन्नत मार्गांवर भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांवर सतत मोठा भार येणार आहे. UHPFRC तंत्रज्ञानामुळे उन्नत मार्ग अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे बनतील. यामुळे रस्ते आणि पूल अधिक टिकाऊ होतील. वारंवार दुरुस्तीची गरज कमी भासेल. वाहतूक बंद करून दुरुस्ती करण्याचे प्रमाण घटेल. संरचनेचे आयुष्य 100 वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकते. उन्नत मार्गांचे वजन कमी असल्याने पाया आणि खांबांवरील भारही कमी होतो. तसेच बांधकामाचा कालावधीही कमी होऊ शकतो. याशिवाय UHPFRC वापरल्यामुळे अनेक संरचनात्मक घटक कारखान्यात (Precast) तयार करून थेट प्रकल्पस्थळी बसवता येतात. त्यामुळे बांधकामाचा वेग वाढतो आणि वाहतुकीवर होणारा परिणामही कमी होतो.
मलेशियाचे तंत्रज्ञान का निवडले?
मलेशियामध्ये उष्ण, दमट आणि मुसळधार पावसाच्या वातावरणात या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. भारतातील, विशेषतः पुण्यासारख्या शहरांतील हवामान आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. मलेशियासह फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि चीन या देशांमध्येही UHPFRC वापरून पूल, मेट्रो, बोगदे आणि उन्नत मार्ग उभारण्यात आले आहेत.
या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले तरी काही आव्हानेही आहेत. जसे की, सुरुवातीचा बांधकाम खर्च सामान्य काँक्रिटपेक्षा अधिक असतो.
विशेष दर्जाचे साहित्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असते. गुणवत्ता नियंत्रण अत्यंत काटेकोर ठेवावे लागते. मात्र, पुढील अनेक दशकांपर्यंत दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने दीर्घकालीन दृष्टीने हे तंत्रज्ञान अधिक किफायतशीर मानले जाते.
पुण्यासाठी काय बदलू शकते?
जर पुण्यातील प्रस्तावित तीन उन्नत मार्गांमध्ये UHPFRC तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला, तर भविष्यात राज्यातील तसेच देशातील इतर मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठीही हे तंत्रज्ञान वापरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे अधिक मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी ठरल्यास, शहराच्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होण्याबरोबरच भविष्यातील शहरी विकास प्रकल्पांसाठीही नवे मानदंड निर्माण होऊ शकतात.
डिस्क्लेमर : UHPFRC दिलेली माहिती इंटरनेटवर आधारित माहितीच्या आधारावर आहे. याबाबत लेट्सअप मराठी कोणताही दावा करत नाही.