मोठी बातमी : राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ पोलिसांना धास्ती; सीओईपी कॉलेजमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू
Pune Police: COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (शिवाजीनगर पुणे) येथील संपूर्ण वसतिगृह परिसर व संपूर्ण COEP कॉलेज परिसरात प्रंतिबधात्मक आदेश लागू केला आहे.
पुणे : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP Technological University) हॉस्टेल कॅम्पसमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘छात्रों की गूंज’ या (Chhatron Ki Goonj) कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक राडा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (शिवाजीनगर पुणे) येथील संपूर्ण वसतिगृह परिसर व संपूर्ण COEP कॉलेज परिसरात प्रंतिबधात्मक आदेश लागू केला आहे. आज 22 ऑगस्टपासून चार दिवस हा आदेश लागू करण्यात आला आहे. या पत्राद्वारे विद्यापीठ परिसर व वसतिगृह परिसरात पुढील चार दिवस कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
तसेच या पार्श्वभूमीवर बाहेरील व्यक्ती, राजकीय पक्ष, संघटना, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी विद्यापीठ परिसरात प्रवेश करून विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे, सभा, बैठक घेणे, घोषणाबाजी करणे, आंदोलन अथवा निदर्शने करणे किंवा सदर घटनेच्या अनुषंगाने जमाव एकत्र करणे यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर व्यक्ती एकत्र आल्यास विद्यार्थ्यांची व विद्यापीठातील कर्मचारी वर्गाची सुरक्षितता धोक्यात येण्याची, विद्यापीठाचे नियमित शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज बाधित होण्याची आणि सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
COEP Technological University व त्याच्या वसतिगृह परिसरात अनधिकृत राजकीय जमाव, आंदोलन, निदर्शने, सभा, घोषणाबाजी किंवा तत्सम कृतींना प्रतिबंध करणे हे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास सार्वजनिक शांतता सुव्यवस्था बिघडवून जीवितास व मालमत्तेस व आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराचे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत
अमृतकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
त्यानुसार सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथील संपूर्ण विदयापीठ तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील वसतिगृह परिसर येथे कुठल्याही राजकीय व्यक्तीस येण्यास व तेथे येऊन आंदोलन करणे, निदर्शन करणे, धरणे, उपोषणे, मोर्चा, रॅली, राजकिय सभा, बैठक, घोषणाबाजी, फलक, बॅनर लावणे, त्याव्दारे आंदोलन करणे व जमाव जमा करणे यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशातून विदयापीठातील विदयार्थी वसतीगृहातील विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आपत्कालीन सेवा, न्यायालयीन कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्ती, पोलीस प्रशासन व विद्यापिठाच्या प्रशासनाच्या पूर्व परवानगीने येणाऱ्या व्यक्ती वगळण्यात आले आहेत.