Ram Shinde Vs Rohit Pawar : बारामती ॲग्रोच्या संचालकांवर गुन्हा दाखल!

Ram Shinde Vs Rohit Pawar : बारामती ॲग्रोच्या संचालकांवर गुन्हा दाखल!

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जमखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामती ॲग्रो या कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदतपूर्व गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी कारखान्याचे संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम ११८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती.

बारामती ॲग्रो साखर कारखान्याने शिफारशींचे उल्लंघन करून सहकार विभागाच्या परवानगीशिवाय साखर कारखान्याचे गाळप सुरू केले आहे, असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला होता. १९८४ च्या खंड ६ चे हे उल्लंघन आहे, असे राम शिंदे यांचे म्हणणे होते. त्यानुसार अखेर सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यात २०२२-२३ या वर्षाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याची शिफारस मंत्री समितीने केलेली होती. परंतु, बारामती ॲग्रो कारखान्याने शिफारशीचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.

Santosh Khade… माय-बापाचा कोयता बंद करण्यासाठी एमपीएससी पास झालो!

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना राम शिंदे यांनी १० ऑक्टोबर २०२२ रोजीच पत्राद्वारे तक्रार केली होती. शिंदे यांच्या या तक्रारीवरुन प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो कारखान्याला भेट देऊन पाहणी केली होती. तसंच सहकार विभाग आणि साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला होता. त्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात बरेच राजकारण तापले होते. तेव्हा बरेच आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube