पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदी रवी लांडगे, उपमहापौरपदी शर्मिला बाबर बिनविरोध
पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा केली.
Ravi Landge elected as Mayor of Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा केली.
महापौर पदासाठी भाजपकडून रवी लांडगे यांनीच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या पदासाठी निवडणूक प्रक्रिया न होता त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. उपमहापौर पदासाठी मात्र सुरुवातीला भाजपच्या शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, विशेष सभेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली काळभोर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपमहापौर पदासाठीही निवडणूक न होता शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर बिनविरोध निवड होण्याची दुर्मीळ घटना घडली.
अजितदादांच्या अपघाताबद्दल शरद पवारांच्या खासदाराला वेगळीच शंका, काय म्हणाले बजरंग सोनवणे?
दरम्यान, महापालिकेतील इतर महत्त्वाच्या पदांचीही घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली आहे. तर सत्तारूढ भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर तसेच गटनेत्यांचे अभिनंदन करताना विविध पक्षांच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यानंतर महापालिकेचे पुढील कामकाज 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले.
