‘जिथे आमचा देव नाही’ तिथे आमचा…; अजितदादांच्या जवळच्या जगतापांची राजीनाम्याची तयारी

  • Written By: Published:
‘जिथे आमचा देव नाही’ तिथे आमचा…; अजितदादांच्या जवळच्या जगतापांची राजीनाम्याची तयारी

पुणे : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर असताना त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला असून, आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं प्रतिक्रिया पुणे शहरातदेखील उमटत असून पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे प्रशांत जगताप यांनीही निर्णय न बदलल्यास राजीनाम्याची घोषणा केली आहे.

प्रशांत जगताप यांनी ट्विट करत पवारांनी घेतलेल्या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. जगताप आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “कितीही इच्छा झाली तरी, किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Ajit Pawar Vs Jayant Patil वादाची झलक : आम्ही आमरण उपोषण करणार, असे पाटील समर्थक म्हणताच अजितदादा म्हणाले, घरी जा!

दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षातील सर्वच नेते भावुक झाले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार मात्र, नेते आणि कार्यकर्त्यांची समजूत काढताना हे कधी ना कधी होणारच होते, इतक्या स्वच्छ शब्दांत कार्यकर्त्यांना आपल्या भावनांना आवर घालण्याचे आवाहन करत होते. पवारांनी आपला निर्णय जाहीर करून ते आपल्या घरी निघून गेले. मात्र, आता पुढील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? असाही प्रश्न राष्ट्रवादीतील नेते कार्यकर्त्यांबरोबरच सर्वपक्षीय राजकीय मंडळींना पडला आहे.

राष्ट्रवादीत कितीही नाही म्हटलं तरी, शरद पवारांना आणि अजित पवारांना मानणारे, असे दोन गट आहेत. मागील काळात काही राजकीय घडामोडी बघितल्या तर त्यावेळीही हे दोन गट प्रकर्षाने दिसले होते. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजितदादांच्या गटाचे मानले जातात. मात्र, तरी देखील त्यांनी “आमचा देव जिथे नाही तिथे नमस्कारही” नाही अशा शब्दात राजीनाम्याची तयारी दर्शवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा

भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यामुळे ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला प्रशांत जगताप यांच्यासाठी सोडावी असे जाहीर आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तेव्हापासून प्रशांत जगताप यांना खासदारकीची वेध लागले असून त्यांनी स्वतःहून काँग्रेसला पुण्याच्या बदल्यात दुसरी जागा देऊ, अशी घोषणा करून टाकली आहे. मात्र, पुणे राष्ट्रवादीतील मोठं नाव असलेले दीपक मानकर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

Video : तु्म्हाला परस्पर निर्णय घ्यायचा अधिकार नाही; पवारांसमोर बसून जयंत पाटील ढसाढसा रडले

दीपक मानकर हे शरद पवारांच्या जवळचे तर जगताप हे अजितदादांच्या जवळचे मानले जातात. पुण्यातून खासदार व्हायचं झाल्यास आणि काँग्रेसने राष्ट्रवादीला जागा सोडल्यास खासदारकीच्या तिकिटासाठी वरिष्ठांची मर्जी आवश्यक आहे. म्हणून तर प्रशांत जगताप आपली मोठ्या पवार साहेबांवरील निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube