शिरूर बसस्थानकावर गर्दीचा घेतला आधार; दोन महिलांनी पाच लाखाचे दागिने चोरले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Shirur – Theft at Shirur bus stand : शिरूर – शिरूर बसस्थानकावरील गर्दीचा गैरफायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या आजूबाजूला पाळत ठेवून तीच्याकडील पर्समधील (Shirur) रूमालात बांधलेले मंगळसूत्र व कर्णफूले असे पाच लाख रूपये किंमतीचं सोन्याचे दागिने चोरून पलायन केलेल्या दोन महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गु्न्हे शाखा व शिरूर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने गेले आठ दिवस अखंड मेहनत करून, शंभरहून अधिक सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करीत ही कारवाई केली. याबाबत रूपाली अनिल काळेल (रा. त्रिमूर्ती नगर, भिगवण रस्ता, बारामती) यांनी फिर्याद दिली होती. त्या, शिरूर तालुक्यातील मलठण येथे भाच्याच्या लग्नसोहळ्यानिमीत्त आल्या होत्या. सोहळा उरकून परत बारामती येथे जाण्यासाठी त्या शिरूर बसस्थानकावर एसटी बसची वाट पाहात असताना संशयित महिलांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.
मनिषा विजय कसबे व शोभा शंकर दामोदर (दोघी रा. संजय नगर, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून, दोघीही सराईत असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. गेल्या रविवारी (ता. ११) शिरूर बसस्थानकावर चोरीची ही घटना घडली होती.
व फलाटावर लागत असलेल्या बारामतीच्या बसमध्ये त्या चढत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पिशवीतील दागिने असलेली पर्स अलगद काढून पोबारा केला होता, अशी माहिती केंजळे यांनी दिली. चोरीला गेलेल्या पर्समध्ये साडेसहा तोळे वजनाचे गंठण व सव्वा तोळे वजनाची कर्णफूले असे सोन्याचे दागिने होते.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! नवलकिशोर राम यांच्या खांद्यावर पुणे महापालिका आयुक्तपदाची धुरा
पाच लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरूर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर तपास केला. शिरूर बसस्थानकासह तालक्याच्या काही भागात व अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे शंभरहून अधिक सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासले.
यात चोरीच्या घटनेनंतर शिरूर बसस्थानकात आलेल्या एका मोटारीवर व तीमध्ये बसत असलेल्या दोन संशयित महिलांवर फोकस केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोर महिलांची पाळेमुळे खोदून काढत पोलिस पथकाने त्यांना चोरून नेलेल्या ऐवजासह त्यांच्या घरातूनच जेरबंद केलं.
शिरूर बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून पाच लाखाचे दागिने चोरणाऱ्या महिला या सराईत गुन्हेगार असून, त्यांनी इतरही ठिकाणी अशाप्रकारे चोऱ्या केल्या असल्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलिस कसून तपास करीत आहेत.
या महिलांना पुढे करून चोरी करणारी मोठी टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता असून, पोलिस त्यादृष्टीने सर्व पर्यायांचा अभ्यास करून तपास करीत आहेत. अशा प्रकारे बसस्थानक परिसर व गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरीला गेले असतील तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा व तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.