तुम्ही सांगा…मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; जे. पी. नड्डांसमोरच फडणवीसांची कार्यकर्त्यांना ऑफर
Speech Of Devendra Fadnavis : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी पक्षासाठी त्याग करण्याची सुचना केली. व्यासपीठावरील दिग्गजांकडे पाहत फडणवीस म्हणाले, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही मला सांगितले पद सोडा, मी पद सोडायला तयार आहे. तुम्ही मला सांगितलं घर सोडा, मी एक वर्ष घर सोडायला तयार आहे. तुमची त्याग करायची तयारी आहे का सांगा ? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान फडणवीसांनी नड्डा यांच्यासमोर केलेले त्यागाचे वक्तव्य ऐकून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पुण्यात आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना देत काही नेत्यांचे कान टोचण्याचे काम देखील केले.
फडणवीस म्हणाले, पुढच्या एक वर्षात कोणाला काही मिळणार नाही. कोणी समिती मागायची नाही, कोणी पद मागायचे नाही. कोणी मंत्रिपद मागायचे नाही. आता ही वेळ आहे की पार्टीने मला काय दिले विचारण्यापेक्षा मी पार्टीला काय देणार? ज्याच्यामध्ये हिम्मत आहे तो मागणार नाही. त्याच्यामध्ये दानत आहे तो मागणार नाही. देणारा तो खरा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले.
Pune BJP State Executive Meeting : फडणवीसांचे ज्येष्ठांना टोले की पंकजा मुंडेंना सुनावले !
यावेळी फडणवीस म्हणाले, अनेक नवे कार्यकर्ते समर्पणाने काम करताना पाहायला मिळतात. त्यांचा पक्षाशी फारसा संबंध आला नसेल तेही चांगले काम करत आहेत. कधीकधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळाले नाही एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही, ज्यावेळी आक्रोश करताना दिसतो. त्यावेळी आपण राजकारणात का आलो असा प्रश्न मला पडतो. पुढच्या काळात तुमच्या कामाचे मूल्यमापन होईल. वर्षभरानंतर त्यांनी त्याग केला आहे, त्यांच्याच त्यागाचे मूल्यमापन होईल. ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा फार उपयोग देखील राहणार नाही, असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.