विद्यार्थ्यांचा विद्यापीठात राडा; परीक्षेत पुन्हा नापास केल्याचा आरोप, पोलिसांना पाचारण

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर विद्यापीठ परिसरात पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 01T214116.238

पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी (Pune) वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मंगळवारी वातावरण चांगलंच तापलं. वर्षभर परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याचा आरोप करत विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाल्याची माहिती आहे. आंदोलनादरम्यान मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप झाल्याने परिस्थिती आणखी चिघळली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित विद्यार्थी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर विद्यापीठ परिसरात पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोपांवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी यंदा विशेष परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने वेळोवेळी संवाद साधला होता. या परीक्षेत काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना बाहेरील काही संघटनांनी प्रशासनाविरोधात भडकवल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.

विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या काही क्लिप्समधून विद्यापीठाची चुकीची प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, संबंधित संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हात उगारल्याचं विद्यापीठाने म्हटलं आहे. ही घटना अवांछित, अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचं सांगत विद्यापीठ प्रशासनाने या प्रकारात विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

follow us